Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जागतिक मोहिमेसाठी महापालिकेच्या वतीने प्रफुल्ल पुराणिक यांची...

गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जागतिक मोहिमेसाठी महापालिकेच्या वतीने प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकाऱी पदी नियुक्ती…

पिंपरी, दि. २२ सप्टेंबर २०२६ — महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच या उत्सवाशी संबंधित कला, परंपरा, संस्कृती व लोकजीवनाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रसिद्धीविषयक उपक्रम राबविणे, त्यांचा समन्वय साधणे तसेच शासन निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी पुराणिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 

 

 

गणेशोत्सवाच्या परंपरा, कला, हस्तकला, सजावट, कौटुंबिक प्रथा, खाद्यपरंपरा, कलाकार व लोककलावंत यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी Bappa.org हे अधिकृत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ या माध्यमातून नोंदविता येणार आहेत. या उपक्रमाच्या प्रसारासाठी महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, स्थानिक संस्था तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

 

 

 

तसेच Bappa.org च्या प्रसारासाठी डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया, प्रचार साहित्य, पोस्टर्स, स्टँडीज व QR कोडच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे, स्थानिक गणेशोत्सव परंपरा व कलावैशिष्ट्यांचे दस्तऐवजीकरण करणे आणि या मोहिमेतील कार्यवाहीचा नियमित अहवाल सादर करणे, अशी कामे नोडल अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहेत.

 

 

 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, लोकपरंपरा, कला आणि सामाजिक सहभाग यांचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments