Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमएच-६१ मालिकेतील पसंती क्रमांकासाठी २३ व २४ सप्टेंबरला अर्ज स्वीकारणार*

एमएच-६१ मालिकेतील पसंती क्रमांकासाठी २३ व २४ सप्टेंबरला अर्ज स्वीकारणार*

 

 

 

 

पुणे, दि. २२ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे एमएच-६१ या संकेतांकांतर्गत दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेत वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

 

एमएच-६१ मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्काच्या तीनपट शुल्कासह घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खाजगी वाहन विभागात अर्ज साद करावा. अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र आणि पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. अशा क्रमांकांसाठी लिलावाचे डिमांड ड्राफ्ट २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत स्वीकारले जातील आणि त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सभागृहात लिलाव करण्यात येईल.

 

तसेच, विहित शुल्क भरून आकर्षक व पसंतीचे क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या दुचाकी वाहनधारकांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज साद करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकासाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत लिलावाचे डिमांड ड्राफ्ट स्वीकारण्यात येतील. प्राप्त अर्जांसाठीचा लिलाव दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात होणार आहे.

 

लिलावासाठीचा डिमांड ड्राफ्ट ‘R.T.O., Pune’ यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेचा असावा. डिमांड ड्राफ्ट दोन महिन्यांपेक्षा अधिक जुना नसावा. अर्जदाराने पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे. लिलावासाठी जमा करण्यात येणारा एकच डिमांड ड्राफ्ट सीलबंद पाकिटात सादर करावा. ‘Pune R.T.O.’ या नावाने सादर केलेले डिमांड ड्राफ्ट तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचे डिमांड ड्राफ्ट बाद करण्यात येतील. एकाच अर्जदाराने एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक पाकिटे सादर केल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

 

लिलावात एखाद्या पसंती क्रमांकासाठी समान रकमेचे डिमांड ड्राफ्ट प्राप्त झाल्यास अर्जदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून क्रमांक निश्चित करण्यात येईल. लिलाव सुरू असताना संबंधित अर्जदार उपस्थित असो अथवा नसो, संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

 

वाहन मालकास विहित शुल्क अदा करून पसंतीचा नोंदणी क्रमांक राखून ठेवता येतो. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८१ मधील नियम ५४-अ नुसार राखून ठेवलेल्या पसंतीच्या नोंदणी क्रमांकाची वैधता १८० दिवस आहे. मात्र, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळामार्फत या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, वैधता संपलेले पसंती क्रमांक पुन्हा पसंती क्रमांकाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे दिसतात.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत. कार्यक्षेत्राबाहेरील पत्त्याचे, चुकीच्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट जोडलेले अथवा अचूक भ्रमणध्वनी क्रमांक नमूद न केलेले अर्ज बाद करण्यात येतील. पसंती क्रमांकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सुधारित शुल्क लागू राहील.

 

लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंती क्रमांकांच्या वितरणासाठी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

 

लिलावाद्वारे पसंतीचा क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी त्यांचा मूळ डिमांड ड्राफ्ट ७ दिवसांच्या आत कार्यालयातून परत घ्यावा. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट परत करण्याची जबाबदारी कार्यालयाची राहणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments