पुणे (प्रतिनिधी)
पुण्यातील ‘टीम स्पोर्टिफाय’च्या दोन धावपटूंनी शुक्रवारी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी लडाखमधील अत्यंत कठीण अशा ७२-किमी ‘खारदुंग ला चॅलेंज’ची शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली.
मनीष धामंगे यांनी ही अल्ट्रा मॅराथॉन ११:४६:२५ या प्रभावी वेळेत पूर्ण केली,तर राहुल गुरुंग यांनी १२:०७:४७ मध्ये शर्यत पूर्ण केली.अशा प्रकारे त्यांनी भारतातील सर्वाधिक आव्हानात्मक आणि उंचावरील (हाय-अल्टिट्यूड) सहनशक्तीच्या शर्यतींपैकी एक शर्यत यशस्वीरीत्या पार पाडली.
ही शर्यत धावपटूंना लडाखच्या खडतर भूप्रदेशातून,विशेषतः १७,हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या प्रसिद्ध ‘खारदुंग ला’ खिंडीतून घेऊन जाते.प्रचंड उंची,विरळ हवा आणि कठीण भूप्रदेश यामुळे हे आव्हान धावपटूंच्या सहनशक्तीची आणि मानसिक खंबीरपणाची खरी कसोटी पाहणारे ठरते.
त्यांचे हे यश म्हणजे प्रशिक्षक विजय बनसोड आणि ‘टीम स्पोर्टिफाय’च्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अनेक महिन्यांच्या समर्पित तयारीचे फळ आहे.या तयारीमध्ये लांब अंतराचे धावणे (long runs),डोंगराळ भागातील प्रशिक्षण (hill training),सहनशक्ती वाढवणारे व्यायाम आणि शर्यतीसाठी विशेष तयारी यांचा समावेश होता.
प्रशिक्षक विजय बनसोड म्हणाले,
“‘खारदुंग ला’ ही केवळ ७२-किमीची शर्यत नाही तर ती तयारी,संयम आणि मानसिक खंबीरपणाची कसोटी आहे. मनीष आणि राहुल यांनी प्रशिक्षणादरम्यान प्रचंड निष्ठा आणि जिद्द दाखवली.त्यांचे हे यश ‘टीम स्पोर्टिफाय’ आणि पुण्यातील धावपटूंच्या समुदायासाठी अभिमानास्पद क्षण आहे.”
मनीष धामंगे – ११:४६:२५ | राहुल गुरुंग – १२:०७:४७
‘खारदुंग ला चॅलेंज २०२६’ मधील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘टीम स्पोर्टिफाय’,पुणे यांनी दोन्ही धावपटूंचे अभिनंदन केले आहे.


