पुणे : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फी मदत निधी देण्यात आला. बाल शिक्षण शाळा, एमव्हीएम रामचंद्र राठी शाळा तसेच आनंद वन सामाजिक संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. गणेशोत्सव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असून, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मंडळाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.
भांडारकर रस्त्यावरील मंडळाच्या गणेश मंडपात हा कार्यक्रम झाला. यावेळी किशोर सरपोतदार, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड आणि स्वागताध्यक्ष नगरसेवक सुनील पांडे-लोहगावकर, अभिजीत मोडक, वरुण जकातदार, ऋषिकेश आर्य, गुणेश साने, चैतन्य रेड्डी, श्रीधर खांडेकर, दिनेश अंभोरे, योगेश जोगळेकर उपस्थित होते.
नवल किशोर राम म्हणाले, उत्सव देशभरात विविध ठिकाणी साजरा होत असला, तरी पुण्याच्या गणेशोत्सवाची वेगळी ओळख आहे. ऐतिहासिक गणेश मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवात सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली होती. आजही उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना मिळत आहे.
सुनील पांडे म्हणाले, शहरातील गरजूंच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे हीच खरी गणेशाची सेवा आहे. गेल्या १७ वर्षांपासून कर्णबधिर मुलांना त्यांच्या गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देत सातत्याने मदत केली जात आहे.
अभिजीत मोडक यांनी सूत्रसंचालन केले. वरुण जकातदार यांनी आभार मानले.
—


