Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाषा हे वादाचे कारण नव्हे तर संवादाचे साधन - डॉ शरद गोरे ...

भाषा हे वादाचे कारण नव्हे तर संवादाचे साधन – डॉ शरद गोरे  तंजावरमधील सरफोजी (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

 

 

तंजावर, २४ सप्टेंबर: “भाषा ही माणसाला माणसाशी जोडणारी सर्वांत प्रभावी शक्ती आहे. एखाद्या समाजाची स्मृती, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि भावविश्व वाहून नेणारे जिवंत माध्यम आहे. म्हणूनच भाषेचा अभिमान असणे स्वाभाविक असले, तरी त्या अभिमानाचे रूप दुसऱ्या भाषेविषयी तुच्छता किंवा वैरभावात बदलणे ही भाषेचीच विटंबना ठरते. भाषा हे वादाचे कारण नव्हे तर संवादाचे साधन आहे.” असे विचार अ. भा. म. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी व्यक्त केले. तंजावर येथील जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आवारातील पेथनन कलैयरंगम सभागृहात सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. यावेळी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते.

 

तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले (प्रदेशाध्यक्ष, तामिळनाडू), छत्रपती आबाजीराजे भोसले, महाराष्ट्राचे माजी उच्चशिक्षण मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून अ.भा. म. साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक आप्पासाहेब गुरव, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले आदीं उपस्थित आहे.

 

डॉ. शरद गोरे म्हणाले, ” आज देशात जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावर सामाजिक दरी निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना तंजावरच्या भूमीत होत असलेले हे मराठी साहित्य संमेलन भाषेच्या व्यापक आणि विधायक भूमिकेचा महत्त्वपूर्ण संदेश देते.”

 

छत्रपती बाबाजीराजे भोसले म्हणाले, “मराठी आणि तमिळ संस्कृतीचा संगम घडविण्याचे काम या संमेलनातून होत आहे. माणसांना जोडण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे. या संमेलनामुळे मराठी आणि तमिळची नाळ जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य झाले आहे.”

 

युवराज संभाजीराजे भोसले म्हणाले,”मराठी भाषा तामिळनाडूमधील सर्वांना समजत नाही आणि तमिळ भाषा महाराष्ट्रातील लोकांना समजत नाही, हा भाषेचा फरक असला तरी येथील नागरिक मायाळू असून आपलेपणाने समजून घेतात. भविष्यात सर्वांनी एकत्र येऊन साहित्याच्या माध्यमातून मराठी तमिळ एकत्रित संस्कृती बळकट करूया.”

 

छत्रपती सरफोजीराजे यांनी तामिळनाडूमध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख करून, मराठी आणि तमिळ या जुळ्या बहिणी असल्याचे डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी नमूद केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न उशिरा झाले असले, तरी आता साहित्य क्षेत्रात सातत्याने काम करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून विविध राजे आणि मावळ्यांनी राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन राज्याराज्यांतील चांगले संदर्भ आत्मसात करावेत आणि त्यातून व्यापक साहित्य संमेलने घडवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

 

संमेलनादरम्यान विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे लिखित ”आरक्षणाचे अ. ब. क. ड,” सूर्यकांत नामुगडे लिखित “सावल्या” आणि लेखक माणिक कदम यांच्या ‘पर्यावरणाची परिक्रमा’ या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा पोहोचविण्यासह विविध भाषिक आणि सांस्कृतिक घटकांना साहित्याच्या माध्यमातून जोडण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला. तसेच डॉ. दीप्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आणि सुप्रसिद्ध कवी रमेश रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन हे उत्साहात पार पडले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी केले. अमोल कुंभार यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments