पुणे : संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मांजरी व शेवाळेवाडी परिसरात कृत्रिम विसर्जन हौद आणि फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले. या उपक्रमातून ३५० हून अधिक गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी ९ ठिकाणी फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली होती.
फाउंडेशनच्या संस्थापिका छाया संजीव गदादे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी धाराशिव जिल्हा परिषद सदस्य अमर मोरे, तुषार जाधव, बाप्पूसाहेब मेमाणे, काका कामठे, संजय जोशी, संतोष खलाडकर, गिरीश कुंजीर, अतुल भगवत यांच्यासह नागरिक व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विसर्जन हौदांजवळ गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी आरती करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना शाल आणि भगवद्गीतेचे पुस्तक यावेळी देण्यात आले.
फाउंडेशनचे सचिव सूरज साळुंके म्हणाले, नदी, कालवा आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांऐवजी नागरिकांनी कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर केला. त्यातून ३५० हून अधिक गणेशमूर्तींचे संकलन झाले.
उपक्रमाच्या सांगतेप्रसंगी मांजरी ग्रीनवुड्स सोसायटीच्या गणेश मंडळाने फिरत्या विसर्जन हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन केले.


