पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. यंदा कोणार्क सूर्य मंदिर रथातून मंडई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे ३२ फूट उंचीचा भव्य रथ आणि त्यावरील आकर्षक विद्युत रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रींचे विसर्जन झाले.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित रथ साकारण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य रचनेमुळे मिरवणुकीदरम्यान रथ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.
बेलबाग चौकात ९.५५ मिनिटांनी पहिला सनई चौघडे रथ दाखल झाला. त्यानंतर १०.३६ मिनिटांनी मुख्य रथाचे बेलबाग चौकात आगमन झाले, त्यानंतर टिळक चौकात ४ वाजता मंडई गणपतीचे आगमन झाले आणि ४.३० च्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रींचे विसर्जन झाले.
मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे सनई-चौघडा वादन, त्यामागे न्यू गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणेशभक्तांच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ
झाली.


