पुणे,३० सप्टेंबर २०२६ : भारताच्या वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्याच्या उद्देशाने फिक्की टॅग २०२६ या फिक्कीच्या वार्षिक वस्त्रोद्योग परिषदेच्या १७ व्या आवृत्तीला आज मुंबईत सुरूवात झाली.या परिषदेमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, सक्षम मुल्यसाखळी आणि जागतिक बाजारपेठेतील व्यापक उपस्थिती यांच्या माध्यमातून भारताला जागतिक वस्त्रोद्योग उत्पादन व सोर्सिंगचे प्रमुख केंद्र बनवण्यासाठी आवश्यक धोरणांवर चर्चा झाली. परिषदेच्या उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि भारत सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा मनोहर देसाई यांच्या हस्ते फिक्की – वजीर वार्षिक वस्त्रोद्योग अहवाल २०२६ चे अनावरण करण्यात आले.
या अहवालात भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, उद्योगाची जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आधुनिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाश्वत मूल्यसाखळीची उभारणी आणि जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक व्यापक प्रवेश या बाबींना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
अहवालानुसार, ऑटोमेशन, डिजिटलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वाढता वापर, शाश्वत उत्पादन पद्धती, मजबूत मूल्यसाखळी आणि निर्यात बाजारपेठेतील विविधता हे भारतीय वस्त्रोद्योगाच्या पुढील विकासातील महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. जागतिक मागणीतील बदल आणि वाढती स्पर्धा लक्षात घेता, भारतीय वस्त्रोद्योगाने तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वततेवर अधिक भर देत जागतिक बाजारपेठेतील आपली उपस्थिती विस्तारण्याची आवश्यकता अहवालातून अधोरेखित करण्यात आली
आहे.


