पुणे/सुरत, सप्टेंबर 2026: श्रीलंका पर्यटन प्रोत्साहन ब्युरोने (एसएलटीपीबी) हैदराबाद, सुरत आणि पुणे येथे आयोजित केलेल्या तीन शहरांतील डेस्टिनेशन वेडिंग रोडशोची यशस्वी सांगता केली. या माध्यमातून भारतातील वेडिंग क्षेत्रातील व्यावसायिकांसमोर श्रीलंकेचे डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे आकर्षक पर्याय आणि संधी सादर करण्यात आल्या. या रोडशोमध्ये वेडिंग प्लॅनर्स, ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या उपक्रमाद्वारे श्रीलंकेला एक प्रीमियम आणि बहुआयामी डेस्टिनेशन म्हणून सादर करण्यात आले, जिथे जोडप्यांना आपल्या विवाहसोहळ्याचे रूपांतर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत आनंददायी विवाहसोहळा तसेच अविस्मरणीय सुट्टीच्या अनुभवात करता येते.
उष्णकटिबंधीय समुद्रकिनारे, आलिशान रिसॉर्ट्स, ऐतिहासिक वारसा स्थळे, धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगा आणि आकर्षक व अद्वितीय ठिकाणांमुळे श्रीलंका डेस्टिनेशन वेडिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देते. जोडपी हिंदी महासागराचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर ठेवून विवाहबंधनात अडकू शकतात, सेंट्रल हायलँड्समध्ये विवाहसोहळा साजरा करू शकतात, ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये समारंभ आयोजित करू शकतात किंवा आलिशान रिसॉर्ट्समध्ये अनेक दिवसांचा भव्य विवाहसोहळा आयोजित करू शकतात. दक्षिण किनारपट्टी आणि कोलंबोपासून कँडी आणि नुवारा एलिया पर्यंत, हे ठिकाण प्रत्येक जोडप्याच्या व्यक्तिमत्त्व, परंपरा आणि स्वप्नांनुसार विवाहसोहळ्याचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देते.
श्रीलंकेची डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना अनुभवी वेडिंग प्लॅनर्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिकांमुळे अधिक सक्षम झाली आहे. हे व्यावसायिक विवाहस्थळ, सजावट, केटरिंग, मनोरंजन, फोटोग्राफी, वाहतूक आणि पाहुण्यांचे व्यवस्थापन अशा सर्व बाबींचे एकत्रित नियोजन आणि आयोजन करतात. श्रीलंकेतील वेडिंग इंडस्ट्री भारतीय विवाहपरंपरा, वैयक्तिक आवडीनुसार मेन्यू, थीमवर आधारित सजावट तसेच लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या सेलिब्रेशनसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे कुटुंबीयांना परदेशात विवाहसोहळा आयोजित करताना अधिक आत्मविश्वास आणि विश्वासार्हतेचा अनुभव मिळतो.
या रोडशोमध्ये ‘विवाहसोहळ्यासोबत सुट्टीचा आनंद’ या संकल्पनेचे आकर्षणही अधोरेखित करण्यात आले. पाहुणे विवाहसोहळ्याच्या आनंदासोबत समुद्रकिनाऱ्यावरील सहली, सांस्कृतिक पर्यटन, वन्यजीव सफारी, वेलनेस अनुभव, निसर्गरम्य प्रवास, खरेदी तसेच विविध पाककृतींचा आस्वाद घेण्याचा आनंद घेऊ शकतात. भारतामधून सहज उपलब्ध असलेली कनेक्टिव्हिटी आणि विविध प्रकारच्या निवासाच्या सुविधा यामुळे कुटुंबीयांना एकत्रितपणे विवाहसोहळा साजरा करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा सहज आणि आरामदायी अनुभव घेता येतो.
रोडशोदरम्यान बोलताना श्रीलंका पर्यटन प्रोत्साहन ब्युरोचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. चामिला जयरथ्ने म्हणाले, “भारत हा श्रीलंकेसाठी आजही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि डेस्टिनेशन वेडिंगच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील हे संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय जोडपी आणि कुटुंबीय सुंदर ठिकाणे, उत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी, अविस्मरणीय अनुभव आणि प्रवासातील सुलभता यांना प्राधान्य देत आहेत. श्रीलंका या सर्व बाबींचा सुंदर मेळ घालते. या रोडशोच्या माध्यमातून विवाहसोहळ्याच्या आयोजनासंदर्भातील निर्णय घेणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत ही संकल्पना थेट पोहोचवण्याची आम्हाला संधी मिळाली.”
श्रीलंका पर्यटन प्रोत्साहन ब्युरोचे अध्यक्ष श्री. बुद्धिका हेवावासम म्हणाले, “भारत ही आमच्यासाठी आजही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि भारतीय प्रवाशांच्या बदलत्या आवडी-निवडी लक्षात घेऊन पर्यटनविषयक संकल्पना विकसित करणे हे आमच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या माध्यमातून आम्हाला श्रीलंकेला केवळ विवाहस्थळ म्हणून नव्हे, तर आनंदोत्सव, पर्यटन आणि एकत्रित वेळ घालवण्याचा अनुभव एकाच प्रवासाचा भाग बनवणारा देश म्हणून सादर करता येते. हैदराबाद, सुरत आणि पुणे येथील वेडिंग प्लॅनर्स आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधून श्रीलंकेची दृश्यमानता वाढवणे आणि विवाहसोहळ्याच्या नियोजनाच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेचा पर्याय विचारात घेतला जावा, हा आमचा उद्देश आहे.”
तिन्ही शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोडशोमध्ये “द हेरिटेज ऑफ कॅन्डियन” या विशेष सादरीकरणाने चैतन्यमय सांस्कृतिक रंग भरला. श्रीलंकेच्या समृद्ध नृत्यपरंपरेचा गौरव करणाऱ्या या मनमोहक सादरीकरणातून देशाचा सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे साकारण्यात आला. प्रभावशाली ताल, मोहक नृत्याविष्कार आणि पारंपरिक नृत्याची राजेशाही छटा यांमधून श्रीलंकेचा सांस्कृतिक वारसा जिवंत केला. आकर्षक पारंपरिक वेशभूषा आणि दागिन्यांनी सजलेल्या महिला आणि पुरुष नर्तकांनी हा नृत्याविष्कार सादर केला. हे केवळ एक सांस्कृतिक सादरीकरण नव्हते, तर भारतीय विवाहसोहळ्याला श्रीलंकेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधिक रंगतदार, वैशिष्ट्यपूर्ण आणि त्या ठिकाणाची खास ओळख अधोरेखित करणारा अनुभव कसा देऊ शकतो, याची झलक वेडिंग प्लॅनर्स आणि माध्यम प्रतिनिधींना यातून मिळाली.
या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीलंका पर्यटन विभागाचा उद्देश पर्यटन उद्योगातील भागीदारी अधिक दृढ करणे आणि वैशिष्ट्यपूर्ण विवाहसोहळ्यांसाठी श्रीलंकेला एक आकर्षक डेस्टिनेशन म्हणून प्रस्थापित करणे हा आहे. भव्य समुद्रकिनाऱ्यावरील विवाहसोहळ्यांपासून ते निसर्गरम्य पर्वतीय भागातील छोटेखानी समारंभांपर्यंत, प्रत्येक विवाहसोहळा प्रेम, नवनवीन अनुभव आणि कुटुंबीय व मित्रपरिवारासोबतच्या एकत्रित आनंदाची अविस्मरणीय कहाणी ठरू शकतो.
श्रीलंकेत लग्न हा प्रवासाचा शेवट नसतो, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असते.


