पुणे, दि. १ (जिमाका वृत्तसेवा): स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हावी, या उद्देशाने देहू नगरपंचायतीच्या वतीने आज घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे स्वच्छता उपक्रमात सहभागी होत घाट परिसर स्वच्छ केला.
या उपक्रमांतर्गत घाट परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच इतर अनावश्यक वस्तू हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासोबतच देहू येथील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आला. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
देहू नगरीला संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे तसेच वारकरी परंपरेमुळे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक देहू येथे येत असतात. त्यामुळे घाट, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व सुयोग्य देखभाल करण्याला नगरपंचायतीकडून प्राधान्य देण्यात येत आहे.
स्वच्छता मोहिमेत नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला. सार्वजनिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही नगरपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.


