*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद*
प्रतिनिधी | पुणे : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात दहा दिवसांच्या कालावधीत ६५८६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये ३,०१,८४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
“श्री गणेशा आरोग्याचा” उपक्रम हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य, श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
पुणे जिल्ह्यात या उपक्रमाचे प्रभावी नियोजन व समन्वय डॉ. मानसिंग साबळे यांनी केला. विविध शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांमध्ये समन्वय साधत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
*घराजवळच मिळाली आरोग्य तपासणीची सुविधा*
पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भाग, नगरपालिका, नगरपंचायती तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.
या शिबिरांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयविकार, इसिजी तपासणी,रक्त तपासण्या, किडनीविकार, कर्करोग,दंतरोग, संसर्गजन्य आजार, फिजिओथेरपी उपचार, आयुर्वेद उपचार, आयुष्यमान कार्ड नोंदणी, अवयवदान नोंदणी,बालरोग तसेच इतर सर्व प्रकारचे आजार तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांची प्राथमिक तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी करण्यात आली.
आरोग्य तपासणीदरम्यान समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित शासकीय, निमशासकीय आणि धर्मादाय रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
*प्रभावी नियोजनातून व्यापक जनसहभाग*
पुणे जिल्ह्यातील उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शासकीय व धर्मादाय रुग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग लाभला.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, आजारांचे प्राथमिक निदान आणि आरोग्य जनजागृती करण्याचा उपक्रमाचा उद्देश यशस्वीपणे साध्य करण्यात आला.
*प्रतिक्रिया*
*“मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यातील विविध यंत्रणा, गणेश मंडळे, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी योग्य ठिकाणी संदर्भित करणे, यावर विशेष भर देण्यात आला.”*
*श्री. रामेश्वर नाईक*
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य.*
*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ — उत्सवातून आरोग्याकडे, आरोग्यातून निरोगी समाजाकडे!*


