पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) आर्किनिअरिंग विभागाने मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स या विषयावर एक हस्तकला कार्यशाळा चौथ्या वर्षांतील विद्यार्थिनींसाठी नुकतीच घेतली. कार्यशाळेचा विषय ‘मेम्ब्रेन बांधकामः संकल्पना ते आकार’ असा असून त्यामध्ये जर्मनीतील देसाऊ येथील आयएमएस बाऊ हाऊसच्या उपसंचालक प्रा.सारा वॉन्डरवीथ तसेच त्यांचे सहकारी प्रा.देवांशी मोदी आणि प्रा. खिश्चन वॉन्डरवीथ यांनी मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. पूर्वा कुलकर्णी आणि प्रा. स्मिता ओगले यांच्या समन्वयातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेपूर्वी बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्य डॉ.शुभदा कमलापूरकर आणि आंतरराष्ट्रीय कक्ष प्रमूख डॉ. श्रुती जोशी यांनी आयोजकांचे स्वागत केले. यावेळी बीएनसीएच्या संशोधन विभाग प्रमुख डॉ. मीरा शिरोळकर, तसेच प्रा.जयंत पटवर्धन, प्रा. सुजाता मेहता, प्रा. सुवर्णा आखेगावकर, प्रा. दिलीप शिंदे उपस्थित होते. या कार्यशाळेत बीएनसीएच्या लॅण्डस्केप आर्किटेक्चर विभाग प्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे तसेच प्रा. श्वेता अलबाळ याही सहभागी झाल्या होत्या.
कार्यशाळेत प्रा.सारा वॉन्डरवीथ यांनी त्यांच्या संस्थेची माहिती सांगताना मेम्ब्रेन स्ट्रक्चर्समध्ये आंतरविद्याशाखीय विचार कसा वापरता येतो यामागचे तत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यामध्ये मेम्ब्रेन स्ट्रक्चर्समधील चार मूलभूत तत्त्वांवर आधारित विद्यार्थिनींचे गट तयार करण्यात आले आणि त्यांना हस्तकलेतून विविध मॉडेल्स तयार करण्याचा अनुभव विद्यार्थिनींना मिळाला.
प्रा. सारा वॉन्डरवीथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या कल्पकतेतून तयार केलेल्या मॉडेल्सची पाहणी करताना त्यातील भौमितिक आकारांना प्रत्यक्ष आकार देण्यास मदत केली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थिनींनी साकारलेल्या मॉडेल्सचे सादरीकरण केले. प्रा.सारा वॉन्डरवीथ यांनी या आकृतीबंधांमागील शैली, वापरलेले साहित्य, त्यातील ताण आणि तयार झालेल्या बांधकाम आकृतीबंधाचे वर्तन यावर मार्गदर्शनपर भाष्य केले. या साऱ्या कार्यशाळेतून सहभागी विद्यार्थिनींना आर्किटेक्चरच्या शैक्षणिक अंगाबरोबरच बांधकामातील प्रयोग आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिझाइन संकल्पनेबाबत समृद्ध भान येण्यास मदत झाली.
डॉ. पूर्वा कुलकर्णी म्हणाल्या की, यापूर्वी आयएमएस बाऊ हाऊस यांच्याबरोबर मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स या विषयावरील विविध संकल्पनांचे आदान प्रदान करण्यात आले असून यातील विविध संकल्पनांबाबत अर्थपूर्ण सुसंवाद झाला आहे. या कार्यशाळेतून विविध डिझाईन व आकृतीबंध निर्माण करण्याच्या शक्यता आजमावून पाहणे शक्य झाले आहे.
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींनी हस्तकौशल्याच्या साधनांमधून विविध प्रकारचे मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स आकृतीबंध साकारले. त्यातून या बांधकाम प्रकारातील विविध आकार व सर्जनशील निर्मितीच्या शक्यता आजमावून पाहता आल्या. या विद्यार्थिनींना या संरचनांमधून वेगळे असलेल्या व ताणण्याजोग्या लवचिक साहित्याच्या वापराबाबत स्पष्टता आली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींना नवीन डिझाईन दृष्टिकोन, तांत्रिक कौशल्य व नाविन्यपूर्ण बांधकाम प्रणालीबाबत वेगळा दृष्टिकोन
मिळाला.


