आज एक ऑक्टोबर २०२६ ! बरोबर २० वर्षांपूर्वी याच दिवशी १ ऑक्टोबर २००६ साली पुणं सोडून कोकणात राजवाडी इथे कायमच्या वास्तव्यासाठी आलो. माझी बहीण श्यामल आणि आम्हा दोघा भावंडांवर अतिशय प्रेम करणारी बेबीआत्या या दोघीजणी खास मला राजवाडीपर्यंत सोडण्यासाठी आल्या होत्या. योगायोगाने तो दसऱ्याचा, म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस होता. पण म्हणून मी तो दिवस निवडला नव्हता, तर वयाची पन्नास वर्षं पूर्ण झाल्यानंतर कोकणातल्या या गावी येऊन राहायचं, असं मी त्यापूर्वी काही वर्षं ठरवलं होतं. त्यानुसार खरं तर त्यावर्षी जानेवारी महिन्यातच मी इकडे येणे अपेक्षित होतं, पण पुण्यात आधीच घेतलेली काही कामं आणि इतर बाबी पूर्ण करेपर्यंत आणखी दहा महिने निघून गेले. त्यामुळे त्यावर्षी गणपती झाल्यावर मी १ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करून टाकली. त्यानंतर लक्षात आलं की त्या दिवशी दसरा आहे! परंपरेनुसार सीमोल्लंघनाचा दिवस आणि माझ्यासाठी तो खरोखर तसाच ठरला होता. यापूर्वीचं आयुष्य पुण्यासारख्या महानगरात घालवलेलं असल्याने, या लहानशा खेड्यात मी कितपत रुळेन, याची जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराला स्वाभाविकपणे चिंता वाटत होती. पण का कुणास ठाऊक, माझ्या मनात तसं कधीच आलं नव्हतं. मी इथे काही खास योजना घेऊन आलो नव्हतो. केवळ राजवाडीतल्या निसर्ग आणि शांत वातावरणाच्या प्रेमात पडून मी हा निर्णय घेतला होता. तरीसुद्धा काहीतरी उपक्रम करण्याची वृत्ती असल्याने इथं येण्यापूर्वीच पीपल्स एम्पॉरिंग मूव्हमेंट या संस्थेची नोंदणी केली होती. माझे पुण्यातले जुने मित्र अमृत पुरंदरे आणि धनंजय माजगावकर हे दोघेजण माझ्यासमवेत या संस्थेचे संस्थापक विश्वस्त झाले, तर माझे मेव्हणे कै. वसंत मांडे, चुलत भाऊ दिलीप उर्फ दादा कामत, संगमेश्वरचे जुने कौटुंबिक मित्र मनोहर भिडे आणि शिरीष दामले यांनी प्रेमापोटी विश्वस्त होण्यास मान्यता दिली. खरं तर मी इकडे पत्रकारिता करण्यासाठीही आलो नव्हतो, पण त्या काळात ‘लोकसत्ता’चे संपादक असलेले ज्येष्ठ स्नेही कुमार केतकर आणि राजू खांडेकर यांनी सहज बोलता बोलता, काहीशा अनपेक्षितपणे या वृत्तपत्राचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी principal correspondent म्हणून नेमणूक केली. केतकरांनंतर संपादकपदाची धुरा स्वीकारलेले जुने मित्र गिरीश कुबेर यांनीही ही जबाबदारी पुढे चालू ठेवण्यास सांगितल्यामुळे २००६ पासून २०२४ पर्यंत म्हणजे सुमारे १७ वर्षं मी इथे ‘लोकसत्ता’प्रतिनिधी म्हणून पूर्णवेळ काम पाहिलं. गमतीचा भाग म्हणजे, पुण्यात पत्रकारितेच्या ऐन उमेदीच्या काळात ‘सकाळ’ वृत्तपत्राचा ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझी कारकीर्द मात्र याहीपेक्षा कमी, १३ वर्षांची राहिली होती. तिथून १९९३ मध्ये बाहेर पडल्यानंतर २००६ मी पुण्यातल्या इतर काही वृत्तपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत राहिलो. या कालावधीत ‘पुणे वार्ता’ या देशातल्या पहिल्या केबल न्यूज चॅनेलचा प्रयोग केला. तसंच ‘प्रवास कोकण रेल्वेचा’ हे पुस्तकही लिहिलं.
कोकणात आल्यानंतर ‘लोकसत्ता’च्या जबाबदारीमुळे आठवड्याचे काही दिवस रत्नागिरी आणि सप्ताहाच्या अखेर ते दोन-तीन दिवस राजवाडी अशी मुक्कामाची विभागणी झाली. पत्रकारितेच्या माध्यमातून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात संपर्क निर्माण झाला आणि राजवाडीतल्या विविध उपक्रमांसाठी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोठा लाभ झाला.
या २० वर्षांच्या काळात राजवाडीत शाळकरी मुलांपासून महिला आणि शेतकऱ्यांपर्यंत विविध घटकांसाठी काही छोटे छोटे उपक्रम राबवले. जिल्हा परिषदेच्या राजवाडीतल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या गरजांनुसार आवश्यक शैक्षणिक साहित्याचं वाटप, सुट्टीच्या दिवशी या मुलांसाठी इंग्लिश, गणित आणि विज्ञानाचे खास वर्ग, निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित लघुपटाद्वारे त्यांच्यात या विषयाबाबत जाणीव जागृती, राजवाडी-ब्राह्मणवाडीसाठी पिण्याच्या पाण्याची घरपोच नळ योजना, त्याचप्रमाणे राजवाडी धामणी आणि चिखली मिळून सुमारे शंभर एकर शेती क्षेत्रासाठी बारमाही सिंचनाची योजना, राजवाडीतल्या महिलांसाठी सवलतीच्या दराने कर्ज योजना, २०२१ च्या जुलै महिन्यात चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या ४९ महिला लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत, संगमेश्वर तालुक्यातल्या शाळांमध्ये आठवी-नववी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांचं निवासी निसर्ग व पर्यावरणविषयक परिचय शिबीर, महिलांनी शिलाई मशीनवर शिवलेल्या कागदी पिशव्या आणि करोनाच्या काळात तयार केलेल्या मास्कची विक्री, नवीन सुती कापडाची हाताने टाके घातलेली ‘राजवाडी गोधडी’, कुक्कुटपालन, शेळीपालन, इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीची रत्नागिरीतल्या ग्राहकांना ॲपच्या माध्यमातून ‘राजवाडी भाजी’ या खास नावाने विक्री, दुग्ध व्यवसाय, २०२१ च्या जुलै महिन्यात चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या ४९ महिला लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत, पर्यटन इत्यादी उपक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.
या वाटचालीत पत्रकारितेबरोबरच व्यापार, उद्योग, साहित्यिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, आर्थिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातल्या मंडळींशी स्नेहाचे धागे जुळले. प्रसिद्ध उद्योगपती दीपक गद्रे, नितीन कानविंदे, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले, सुकांत चक्रदेव, राजेश कळंबटे, राजेंद्र चव्हाण, मनोज मुळे, किशोर मोरे, प्रमोद कोनकर, अनघा निकम, ज्योती मुळे, शोभना कांबळे, जान्हवी पाटील, डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. पराग हळदणकर, डॉ. समीर जोशी, डॉ. रत्ना जोशी, डॉ. क्षितीज जोशी, डॉ. संजय लोटलीकर, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ श्रीधर ठाकूर, डॉ. श्रीरंग कद्रेकर, कॅप्टन दिलीप भाटकर, डॉ. विवेक भिडे, दाक्षायणी बोपर्डीकर संगमेशवरचे दोन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध असलेले मनोहर भिडे, अनिल भिडे, उपेंद्र/ओंकार भिडे, प्रमोद भिंगार्डे, उमा दामले, नीलेश कदम, उदय लोध, अमोल लोध, प्रभाकर घाणेकर, नेहा संसारे, शिल्पा/ नितीन करकरे, निबंध कानिटकर, उदय पाध्ये, श्रीनिवास पेंडसे, प्रतीक मोरे, प्रकाश देशपांडे , आशुतोष जोशी, मीनल ओक, प्रशांत पटवर्धन, अनीश पटवर्धन , मुक्ता दाभोलकर, सुनीता गांधी, मल्हार इंदुलकर, पराग वडके, ऋतुजा खरे इत्यादींचा आवर्जून उल्लेख करायला हवा. यापैकी अनेकांचा राजवाडीतल्या उपक्रमांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे महत्त्वाचा हातभार लागला आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत सुमारे दहा वर्षं राहण्याची मोफत सोय करून कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वागवणारे सुधीर दामले-धनश्री गुण्ये या दांपत्यानेही मोठा आधार दिला.
मी इथं आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी, २००८ मध्ये समाजशास्त्रज्ञ आणि नवमहाराष्ट्र फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त निर्मल पंडित यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसह राजवाडीला भेट देऊन इथल्या विकासात्मक उपक्रमाबाबत अनौपचारिक चर्चासत्र घडवून आणलं. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळातल्या उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्यक केलं त्यांच्याचमुळे पुढल्या काळात मोठ्या आर्थिक सहाय्यासाठी काही व्यक्ती/संस्थांशी परिचय झाला. यातूनच राजवाडीसह तीन गावांमध्ये राबवलेल्या पिण्याचे पाणी आणि सिंचन योजनांसाठी पुण्याच्या बासुरी फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त डिंपल राय यांनी २०१४ ते २४ अशी सलग दहा वर्षं सढळ हाताने आणि उदारपणाने आर्थिक सहाय्य केलं. पुण्यातला आणखी एक जुना मित्र प्रवीण महाजन राजवाडीतल्या कार्यकर्त्यांना त्याच्या ‘जनार्थ’ या संस्थेतर्फे दरवर्षी आर्थिक सहाय्य करत असतो.
त्याचबरोबर माझे महाविद्यालयीन काळापासूनचे मित्र आणि पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, त्यांचे बंधू आबा रावत आणि भगिनी उमा हे त्रिकूट कोणत्याही मदतीसाठी सदैव तयार असतं. पुण्यातल्या दीर्घकाळ वास्तव्यामुळे तिथल्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक मित्र-मैत्रिणी झाले आहेत. त्यांच्यापैकी आनंद आगाशे, गिरीश कुबेर, अमोल पालेकर, संध्या गोखले, मुकुंद संगोराम, सुजाता देशमुख, सुधीर गाडगीळ, संदेश भंडारे, ख्यातनाम उद्योगपती कै. रवी पंडित आणि निर्मल पंडित, अभय कुलकर्णी, गौरी आठल्ये, शुभा गडकरी, दिलीप आठवले, उषा सोमय्याजी, राजू शहाडे इत्यादींनी राजवाडीत मुक्काम करत मैत्रीपूर्ण प्रोत्साहन दिलं आहे. दीप्ती/पार्थ बापट आणि अभिजीत घोरपडे या पर्यावरण तज्ज्ञ मित्रांनी तर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांसाठी इथला निसर्ग, जैवविविधता आणि लोकजीवनाचा परिचय करुन देणारी निवासी शिबिरं आयोजित केली. गेल्या मे महिन्यात राजवाडीलगत वाहणाऱ्या राजगंगा नदीतील गाळ उपशासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्परतेने मंजुरी दिली आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशासकीय कार्यवाही केली. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकलं. स्थानिक आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावाही महत्त्वाचा राहिला. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात व समीर जानवळकर यांचा उत्तम समन्वय आणि जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाचा शास्त्रीय पद्धतीने कामाची पूर्तता झाली.
हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी कामत कुटुंबियांचा मनःपूर्वक पाठिंबा अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. कारण काही उपक्रम आमच्याच खासगी जमिनीमध्ये राबवले आहेत. माझ्या विस्तारित कुटुंबाचे सदस्य वाडीचे गावकर प्रकाश खांबे, सुहास लिंगायत, संतोष भडवळकर, गणेश सुर्वे, विलास पाटणकर, विलास गोमाने, चंद्रकांत भडवळकर, नंदू कलवारी, अरुण कलवारी, बाळूदा लिंगायत, आप्पा शिंदे, वसंतदादा मांजरेकर, विलास राऊत, दीपक म्हादे, सुनील शिंदे, ओंकार शिंदे, बाबू टाकळे, प्रकाश टाकळे, प्रकाश रांजणे, जयराम जय भडवळकर, नंदू मांजरेकर, अमित सुर्वे, प्रमोद तेंडुलकर, योगेश बोरसूतकर, स्वप्नील लिंगायत, नरेंद्र बाटे, बागुल शिंदे, ऋषभ देवरुखकर, सौरभ पांचाळ, अभिषेक कलवारी, वैभव राऊत,
सिद्धेश मनवे, सखाराम म्हादे, प्रतीक्षा पोतदार, भारती पांचाळ, कल्याणी राऊत, अनिता रूपा बोरसूतकर, मंगल मनवे, अनिता पवार, कल्पना देवरुखकर, प्रमिला खांबे, ललिता म्हादे, सविता देवरुखकर इत्यादींच्या उत्स्फूर्त आणि उत्साही सहभागाशिवाय काहीच शक्य झालं नसतं, हेही नमूद करायला हवं.
गेल्या वीस वर्षांच्या काळात इथल्या निसर्ग आणि लोकजीवनात मी छान मिसळून गेलो आहे. त्यामुळे जगणं अतिशय सुखाचं, आनंदाचं झालं आहे. माझ्या दृष्टीने ती जमेची मुख्य बाजू आहे. वर उल्लेख केलेले विविध उपक्रम हा केवळ त्याचा ‘साईड इफेक्ट’ आहे. त्यामुळेच ही दोन दशकांची जीवनयात्रा आनंदमयी ठरली आहे.
सतीश कामत, ज्येष्ठ पत्रकार, रत्नागिरी


