, पुणे.- आंदोलनासाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेल्या एस. एम. जोशी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे. पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गुरुवार दि. 1 ऑक्टोबर पासून गरवारे महाविद्यालयामागील एस. एम. जोशी पुल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तेथील पोलिसांकडून माहिती घेतली असता एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सदर पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या अनुषंगाने काही प्रश्न पडत असून आपण याबाबत योग्य खुलासा करावा ही विनंती.
1) सदर आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे कां ?
2) दिली असल्यास हा चुकीचा पायंडा पडत आहे असे वाटत नाही कां ? उद्या अन्य एखाद्या संघटनेने, राजकीय पक्षाने २/४ दिवस एखादा रस्ता किंवा म्हात्रे पुल वा तत्सम ठिकाणी अशी परवानगी मागितल्यास ती देणार कां ?
3) सदर आंदोलन किती काळ चालणार आहे ? एखाद्या शासकीय कार्यालयासमोर ( जिल्हाधिकारी कार्यालय, विधान भवन ) किंवा मैदानात हे आंदोलक हलवून सामान्य पुणेकरांना दिलासा देता येईल कां ?
कायदा, सुव्यवस्था राखत,सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू ठेऊन आपण योग्य कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.


