*दिवाळीच्या खरेदीसाठी विविध वस्तूंची रेलचेल; ११० हून अधिक स्टॉल्सचा समावेश*
*शेवटचे दोन दिवस बाकी; पुणेकरांना वस्तूंची खरेदी करण्याची संधी*
पुणे, दि. ९ : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखाज् कारीगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान बंड गार्डन रोडवरील पूना क्लब येथे हे चार दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध आकर्षक वस्तूंची खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कारागीर, उद्योजक आणि स्टॉलधारकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. हातमागावरील (हँडलूम) वस्त्रे, पारंपरिक हस्तकला, फॅशन व लाइफस्टाइलशी संबंधित उत्पादने, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. दिवाळी जवळ आल्याने सणासाठी आवश्यक विविध वस्तू, आकर्षक सजावटीचे साहित्य आणि नातेवाईक व आप्तस्वकीयांना भेट देण्यासाठी उपयुक्त भेटवस्तूंचीही येथे रेलचेल आहे. विशेष म्हणजे, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या विविध कलात्मक व सजावटीच्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
खाद्यपदार्थांच्या विभागातही विविध राज्यांतील खास खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. मैदाविरहित तसेच ज्वारी, नाचणी, बाजरी आणि गहू यांपासून तयार केलेली विविध खाद्य उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय झिरो ऑइल अर्थात तेलाचा वापर न करता तयार केलेल्या खाद्यपदार्थांसह देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीही या प्रदर्शनात मिळत आहे.
या प्रदर्शनात ११० हून अधिक स्टॉल्सचा समावेश असून, महिला स्टॉलधारकांची संख्या लक्षणीय आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू, पारंपरिक कलाकुसरीचे नमुने आणि विविध उत्पादनांच्या माध्यमातून त्यांच्या उद्योजकीय कौशल्याला व्यासपीठ मिळत आहे. भारतीय हस्तकला, पारंपरिक कारागिरी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच कारागीर, उद्योजक, डिझायनर्स आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
*शेवटचे दोन दिवस बाकी; पुणेकरांनी भेट द्यावी*
प्रदर्शनाचे आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. दिवाळीची खरेदी, आकर्षक भेटवस्तू, पारंपरिक हस्तकला, हातमागावरील वस्त्रे, पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू आणि विविध राज्यांतील खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींची खरेदी व अनुभव एकाच ठिकाणी घेण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी कुटुंबीयांसह या प्रदर्शनाला भेट देऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी आणि कारागीर व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देता येणार आहे.
प्रदर्शनाचा समारोप रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.


