दीर्घकालीन विकास आणि विश्वशांतीसाठी गोव्यातील सामाजिक संस्था, संप्रदाय आणि आंतरधर्मीय संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन
पणजी, दि. 15 ऑक्टोबर : शिक्षणातून जबाबदार नागरिक घडतील, अशा शिक्षण व्यवस्थेची आज गरज आहे. त्यामुळे वेगळ्या शैक्षणिक मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये रुजवली गेली पाहिजेत. वर्तमान काळात आपण भूभाग एकत्रित करायला शिकलो, परंतु लोकांची मने एकत्रित करता आली नाहीत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचे पालन केल्यास संपूर्ण जगात शांती नांदेल. त्यामुळे विश्वशांती आणि मानवाच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी कार्य करावे, असे आवाहन गोव्याचे राज्यपाल पूसापती अशोक गजपती राजू यांनी केले.
वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, गोवा व युनेस्को चेअर यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथील वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ‘दीर्घकालीन विकास आणि विश्वशांतीसाठी गोव्यातील सामाजिक संस्था, संप्रदाय आणि आंतरधर्मीय संवाद’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी गोव्याचे आमदार निळकंठ हालर्णकर, गोवा विद्यापीठाचे वरिष्ठ प्रा. डॉ. मालापती जनार्धनम
, डब्ल्यू.पी.यू.चे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय उपाध्ये, सह-संयोजक डॉ. मिलिंद पात्रे, डब्ल्यू.पी.यू.चे कुलगुरू प्रा. डॉ. रविराज सीताराम, कुलसचिव डॉ. गणेश पोकळे आणि ॲड. शशिकांत जोशी उपस्थित होते.
या प्रसंगी गोव्यातील वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को चेअर प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.
राज्यपाल पूसापती अशोक गजपती राजू म्हणाले, “न्याय, अहिंसा आणि सर्वांबद्दल आदर ही तत्त्वे सर्व धर्मांची आहेत आणि तीच मानवतेचे सूत्र आहे. हा विचार घेऊन सर्वांनी कार्य करावे. लोकशाही ही मानवी प्रतिष्ठेचा पाया आहे. वर्तमान काळात सर्व धर्म सहिष्णुतेच्या शिक्षण पद्धतीची आज सर्वत्र गरज आहे. पर्यावरणाचे संवर्धन करून शाश्वत विकास साधणे गरजेचे आहे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “गोवा हे पर्यटन स्थळ असले तरी येथे विद्वानांची मांदियाळी आहे. तसेच शाश्वत विकासासाठीचे हे जगातील महत्त्वाचे केंद्र आहे. सर्वधर्म समभावाचे शिक्षण व्यवस्थेत कसे आणता येईल, हा विचार महत्त्वाचा आहे. यातूनच समाजात शांती आणि स्थिरता येईल. शिक्षणातून सामाजिक उत्तरदायित्व या विचारधारेने आम्ही कार्य करतो. शिक्षणच समाज व्यवस्थेला आकार देते. येथील विद्यापीठातून बहुविद्याशाखीय शिक्षण प्रणाली देण्याचा उद्देश आहे. येथे नव्याने सुरू होणाऱ्या विद्यापीठाचा अजेंडा हा जागतिक स्तरावरील आहे. शिक्षण हे सामाजिक जाणीव देणारे असावे. याच निमित्ताने घेण्यात आलेली ही परिषद समाज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी ऑनलाईन संदेशात सांगितले की, “विश्वशांतीचा संदेश संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी हे विद्यापीठ सतत कार्यरत असते. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सतर्क व आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असावा.”
डॉ. रविराज सीताराम म्हणाले, “डब्ल्यू.पी.यू.ने शांततेचे तत्त्व धारण करून शिक्षणातून मूल्याधिष्ठित ज्ञान देण्याचे कार्य केले आहे. त्याच तत्त्वाचे पालन करून दुसऱ्या पिढीने शिक्षणाची नवी संकल्पना समोर आणली आहे. डॉ. राहुल कराड यांनी गोवा येथे जागतिक स्तरावरील विद्यापीठाचे बीज रोवले आहे. यापूर्वी त्यांनी एल.टी.सी., एन.एल.सी. आणि बी.सी.एस. सारखे अद्वितीय कार्यक्रम सुरू केले आहेत.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘दीर्घकालीन विकास आणि विश्वशांतीसाठी गोव्यातील सामाजिक संस्था, संप्रदाय आणि आंतरधर्मीय संवाद’ या विषयाची आज समाजाला का आवश्यकता आहे, हे प्रस्तावनेतून मांडले.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले, तर आभार डॉ. मिलिंद पात्रे यांनी मानले.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
बॉक्स
विश्वशांती, मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण व गोवा समृद्धीसाठी चळवळ उभारावी
या वेळी ठराव करण्यात आला की, जगभरात वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विश्वशांतीसाठी प्रयत्न करणे, समृद्ध आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या गोव्यात शाश्वत विकासाला चालना देणे, पर्यावरण संवर्धनासाठी चळवळ उभारणे, शाश्वत जलव्यवस्थापनासाठी कार्य करणे, पर्यावरण संरक्षणासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, जमिनीचा ऱ्हास थांबविण्यासाठी जनजागृती करणे, ग्रामीण आणि शहरी वसाहतींमध्ये ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे कायदे कठोर करणे, गोव्यातील वास्तुशिल्प व ऐतिहासिक स्थळांना संरक्षण देणे आणि विज्ञान-अध्यात्मावर आधारित मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण व्यवस्था विकसित करण्यासाठी जागतिक मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण व्यवस्थापन परिषदेची स्थापना करणे, असा ठराव या परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
—


