Friday, October 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम* ...

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम* *पुणे जिल्ह्यात २१ मतदार नोंदणी अधिकारी, ६४७ सहायक अधिकारी व ८,४२४ बीएलओ असतील कार्यरत*

 

 

▪️ *१७, १८ तसेच २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे; दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत*

 

पुणे, दि.१६ : जिल्ह्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासावेत आणि आवश्यक असल्यास २६ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

या मोहिमेसाठी पुणे जिल्ह्यात २१ मतदार नोंदणी अधिकारी, ६४७ सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि ८ हजार ४२४ बूथस्तरीय अधिकारी कार्यरत असतील. विशेष शिबिरांच्या दिवशी बूथस्तरीय अधिकारी संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती तसेच अन्य आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

 

प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही किंवा वैयक्तिक तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक ६, मतदार यादीतील नावावर आक्षेप नोंदविण्यासाठी किंवा नियमानुसार नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७, तर निवासस्थानातील बदल, तपशिलातील दुरुस्ती, नवीन मतदार ओळखपत्र मिळविणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो. पात्र नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया वर्षभर सुरू असल्याने अद्याप नोंदणी न झालेल्या नागरिकांनीही या संधीचा लाभ घ्यावा.

 

मतदार यादीतील नाव तपासणे, नवीन नोंदणी किंवा अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या मदत केंद्रातूनही मार्गदर्शन घेता येईल. जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासावेत आणि आवश्यक दावे व हरकती २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments