Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedखेळाडूंनी मानसिक ताकदीचा विचार करावा विश्वचषक विजेते बलविंदर सिंग...

खेळाडूंनी मानसिक ताकदीचा विचार करावा विश्वचषक विजेते बलविंदर सिंग संधू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

 

पुणे, ता. १७ – सध्या क्रिकेटपटू केवळ शारीरिक ताकदीचा विचार करतात. मात्र, क्रिकेटपटूंसाठी मानसिक ताकद तितकीच महत्त्वाची असते. मानसिक ताकदीच्या जोरावरच प्रतिस्पर्ध्याचा सामना करता येतो आणि लढती जिंकता येतात, असे मत भारताचे विश्वचषक विजेते क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांनी व्यक्त केले. टी-२० क्रिकेट हे पूर्णपणे मनोरंजनासाठी आहे. यात मनोरंजन नसेल, तर प्रायोजक नाराज होतील, प्रेक्षक नाराज होतील. जाहिरातदार नाराज होतील. मात्र, खरे क्रिकेट कसोटीच आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

 

माजी वेगवान गोलंदाज बलविंदरसिंग संधू यांनी लिहिलेल्या ओपन माईंड – द इनर गेम ऑफ क्रिकेट या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झाले. पीवायसी हिंदू जिमखाना येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी गार्डियन डेव्हलपर्सचे संचालक मनीष साबडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कारगिल वॉर हिरो कर्नल ललित राय, अमेरिकेचे क्रिकेटपटू राजू बडदरे, मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत, माजी क्रिकेटपटू भरत नाडकर्णी, सुभाष पाटणे आणि अनेक आजी-माजी खेळाडू, बलविंदरसिंग संधू यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर शंतनू सुगवेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

 

बलविंदरसिंग मानसिक ताकदीचे महत्त्व सांगताना म्हणाले, सुनील गावसकरांनी मानसिक ताकदीने वेस्ट इंडिजच्या तोफ खान्याचा सामना केला. जगातील कुठल्याही खेळाडूला विचारा. ९६ टक्के खेळाडू मानसिक ताकद महत्त्वाची असते, असे सांगतील. पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बरेच खेळाडू रोज ९ ते १० तास सराव करतात. मात्र, त्यांचा हा सराव फक्त शारीरिक कौशल्यांचा असतो. ते मानसिक तयारीवर किंवा मानसिक पैलूवर फारसा वेळ देत नाहीत. जेव्हा मी ही पुस्तके लिहायला सुरुवात केली, तेव्हा मी तंत्रज्ञानासोबतच मानसिक बाजूवरही भर दिला. क्रिकेटच्या उच्च पातळीवर खेळण्यासाठी पुल शॉट, कव्हर ड्राइव्ह, बॅक फूट आणि फ्रंट फूट डिफेंड यांसारखे मूलभूत आणि प्रभावी शॉट्स तुम्हाला जमलेच पाहिजेत. जर तुमच्याकडे हे शॉट्स असतील, तर तुम्ही जगात कुठेही यशस्वी होऊ शकता. यासाठी त्यांनी सचिन तेंडुलकर यांचेही उदाहरण दिले.

 

टी-२० क्रिकेट केवळ मनोरंजनासाठी

टी-२० क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटची तुलना करताना बलविंदरसिंग म्हणाले, टी-२० क्रिकेटचा उद्देश केवळ पैसे कमावणे आहे. त्याचा सर्वांनाचा फायदा होतो. मात्र, कसोटीपटूंना जो आदर मिळतो, तो केवळ टी-२० क्रिकेट खेळणा-यांना मिळत नाही. वडापाव, भेळ या चटपटीत पदार्थांचा स्वाद दोन दिवसांत संपून जातो, पण आई किंवा आजीच्या हातच्या जेवणाची चव आय़ुष्यभर लक्षात राहते. कसोटी क्रिकेट हे तसेच आहे.

 

…म्हणून लढवय्या झालो

आपल्यातील लढाऊबाणाबद्दल ते म्हणाले, मी अशा ठिकाणांहून आलो की तेथील परिस्थिती अशी होती की जर तुम्ही नाही लढलात तर तुम्ही संपलात. त्या परिस्थितीमुळे आम्ही स्ट्रीट फायटर बनलो, आणि तीच जिद्द व वृत्ती घेऊन मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. माझ्या याच जिद्दीमुळे मी गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही योगदान देऊ शकलो.

 

 

प्रशिक्षकांसाठी…

सध्याच्या प्रशिक्षकांना सूचना करताना ते म्हणाले, अनेकदा काही प्रशिक्षक अनवधानाने खेळाडूला सतत त्याच्या चुका दाखवत राहतात आणि त्याला सतत टोकतात की तू हा शॉट खराब खेळलास. पण, त्याऐवजी जर प्रशिक्षकाने खेळाडूला सकारात्मक ऊर्जा दिली आणि त्याला सांगितले की, “तू हा शॉट अधिक चांगला कसा खेळू शकतोस?”, तर त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढेल आणि तो नक्कीच उत्तम कामगिरी करेल.

 

पुस्तकाचे कौतुक

अमेरिकेचे क्रिकेटपटू राजू बडदरे यांनी ओपन माइंड्स : द इनर गेम ऑफ क्रिकेट या पुस्तकाचे कौतुक केले. ते म्हणाले, क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता कशी विकसित करायची, यासाठी आपले विचार खुले करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बबलू पाजींनी (बलविंदरसिंग) आपल्या पुस्तकात हाच विषय मांडला आहे. आपण आपली जिज्ञासा कशी हाताळतो? दबावाचा सामना कसा करतो? गोष्टी आपल्या विरोधात जात असताना परिस्थितीला कसे सामोरे जातो? या सर्वांची प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत. मनीष साबडे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमामागील भूमिका विषद केली.

नाना पाटेकरांना श्रद्धांजली

 

या कार्यक्रमासाठी दिवंगत अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनाही या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी नानांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणा-या कामाचा संदेश देणा-या उपक्रमाचा शु

भारंभ करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments