Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभांडारकर संस्थेच्या माहितीपटाचा ऐतिहासिक ठेवा चित्रपट संग्रहालयाकडून सुपूर्द*

भांडारकर संस्थेच्या माहितीपटाचा ऐतिहासिक ठेवा चित्रपट संग्रहालयाकडून सुपूर्द*

 

 

पुणे, दि. १८ – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यावर तयार केलेल्या माहितीपटाची अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रूपांतर केलेली प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून आज भांडारकर संस्थेला सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आली. हा माहितीपट संस्थेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने ख्यातनाम निर्माते दिनकर जोशी यांनी १९६७ साली तयार केला होता. नानी शहापूरकर हे त्याचे दिग्दर्शक होते. भांडारकर संस्थेच्या मानद सचिवपदी तेव्हा ख्यातनाम संशोधक पद्मभूषण डॉ. रा. ना. दांडेकर हे होते.

 

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (सेन्सॉर बोर्ड) १९६९ मध्ये पारित झालेल्या माहितीपटाचा हा ऐतिहासिक ठेवा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापक भावेश सिंग, भांडारकर संस्थेच्या व्यवस्थापनाचे सदस्य सुनील भंडगे, मनोज एरंडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

इंग्रजी माहितीपटाच्या चित्रीकरणाचे प्रत्यक्षदर्शी असलेले ज्येष्ठ संशोधक डॉ. ग. उ. थिटे यांनी सांगितले की, तीन ते चार दिवस हे काम सुरू होते आणि त्याविषयी मोठे औत्स्युक्य होते. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनन्द बापट यांनी याविषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, सध्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची जागा ही डॉ. मु. रा. जयकर यांची आहे. डॉ. जयकर हे तत्कालीन पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यावेळी भांडारकर संस्थेच्या जागेतच १९४९ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. त्यामुळे डॉ. जयकर, चित्रपट संग्रहालय आणि भांडारकर संस्थेचे जुने ऋणानुबंध आहेत. या माहितीपटाच्या त्यावेळच्या ३५ एमएमची रिळे असलेल्या प्रती सन २००३ मध्ये दिनकर जोशींनी भांडारकर संस्थेकडे सुपूर्द केल्या होत्या, नंतर २००८ मध्ये त्याचे योग्य जतन व्हावे म्हणून त्या चित्रपट संग्रहालयाला देण्यात आल्या. या माहितीपटाशिवाय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने संस्थेसंबंधात दोन फिल्म्स केल्या आहेत, त्यांचा देखील शोध घेणे आवश्यक आहे.

 

यावेळी भूपाल पटवर्धन म्हणाले की, गेली १९ वर्षे फिल्म संग्रहालयाने सुरक्षित जतन केल्यामुळेच या माहितीपटाचे डिजिटायझेशन आता होऊ शकले आहे. संस्थेकडील अनेक दुर्मिळ ठेव्याचे डिजिटायझेशन सुरू आहे, त्याकरिता देखील चित्रपट संग्रहालयाचे सहकार्य आम्ही घेऊ इच्छितो.

 

संस्थेच्या ज्ञानभारतम् केंद्राच्या समन्वयक डॉ. वीणा राज यांनी या माहितीपटाच्या डिजिटायझेशनकरिता पुढाकार घेतला होता, त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments