पुणे : देवीने महिषासुर, चंड-मुंड यांसारख्या राक्षसांचा संहार केला, त्याचप्रमाणे आजची स्त्रीदेखील समाजातील आव्हानांचा सामना करत बदलाची प्रक्रिया पुढे नेत आहे. आज महिलांनी केवळ विविध क्षेत्रांत काम करण्यापुरते मर्यादित न राहता नेतृत्वाची जबाबदारीही स्वीकारली आहे. स्त्री ही केवळ त्यागमूर्ती नसून शक्ती, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. तिला आदर्शाच्या चौकटीत अडकवू नका, तर तिच्या कर्तृत्वाला वाव द्या, असे प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
कात्रजमधील श्री भवानी माताजी जैन मंदिर ट्रस्टतर्फे नवरात्रीनिमित्त नवदुर्गा व आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कात्रज-भिलारेवाडी येथील श्री चामुंडा भवानी माता मंदिरात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यंदाचा आदर्श माता पुरस्कार सुशीला मुथा व मंगला नाहर यांना प्रदान करण्यात आला. तसेच विमल बाफना, विद्या नाईकनवरे, एकता भन्साळी, डॉ. नीता मुंशी, प्रेरणा नाहर, ज्योती नाहर, भारती विजयजी भंडारी, नवीना पोरवाल व अनिता ओसवाल यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल नवदुर्गा सन्मान २०२६ प्रदान करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत नाहर, महामंत्री संपतराज नाहर, खजिनदार सुभाष नाहर, उपसचिव राजेश आर. नाहर, उपखजिनदार मनोज नाहर, महिला अध्यक्षा अंजली नाहर व युवा अध्यक्ष गौरव नाहर यांच्यासह ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, महिला मंडळ, युवा कार्यकर्ते व नाहर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे व नागौर येथे भव्य भवानी माताजी मंदिरांच्या उभारणीत दूरदृष्टीपूर्ण व यशस्वी नेतृत्व तसेच मंदिरांच्या विकासासाठी केलेले योगदान आणि धार्मिक, सामाजिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री भवानी माताजी जैन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राजेश पी. नाहर म्हणाले, भारतीय संस्कृतीत आईचे स्थान महत्त्वाचे असले, तरी कुटुंबासाठी तिने केलेला त्याग आणि संघर्ष अनेकदा दुर्लक्षित राहतो. तिच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे, तर श्रद्धा, संस्कार, सेवा आणि सामाजिक एकतेचे केंद्र व्हावे, हा यामागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले. आभारप्रदर्शन प्रकाश नाहर यांनी केले.


