Thursday, October 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedउदयन चळवळीचा मुंबईत प्रारंभ; विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकारण्यासाठी पुढील दहा...

उदयन चळवळीचा मुंबईत प्रारंभ; विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकारण्यासाठी पुढील दहा वर्षांत १,००० युवा संस्थानिर्मात्यांची फळी घडविण्याचा राष्ट्रीय उपक्रम

 

शिक्षण, प्रशासन, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शकांनी उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिपच्या पहिल्या विद्यार्थी गटासोबत एकत्र येत युवा नेतृत्व घडविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. भारतात पूर्वी ज्या पद्धतीने संपूर्ण समाजाच्या सहभागातून नेतृत्व घडविले जात असे, त्याच परंपरेला नव्या स्वरूपात पुढे नेण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२६: काही तरुण भारतीय बदलाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असताना, मुंबईत शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी एका वेगळ्या प्रकारच्या उत्तराची सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शकांचा एक संस्थापक गट एकत्र आला. २०४७ च्या भारताची उभारणी करणारे युवा नेतृत्व घडविण्यासाठी राष्ट्रीय चळवळ सुरू करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या संस्थापक गटामध्ये विविध विद्यापीठांचे कुलगुरू, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नेतृत्व मार्गदर्शक, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) आणि सामाजिक प्रभाव क्षेत्रातील रणनीतीकार, उद्योगसंस्थांचे संस्थापक, अनेक उद्योजकीय उपक्रम उभारलेले उद्योजक, वकील आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश होता. जीवनाच्या विविध टप्प्यांवरील हे सर्वजण एकत्र आले होते. करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारे गृहस्थाश्रमी, आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करणारे वानप्रस्थाश्रमी आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून जीवनाकडे पाहणारे संन्यासी, अशा विविध जीवनावस्थांतील व्यक्ती या गटात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिपच्या (यूएसएसएल) पहिल्या विद्यार्थी गटातील विद्यार्थी म्हणजेच ब्रह्मचारी, अर्थात ज्ञान आणि अनुभव घेणारे विद्यार्थीही उपस्थित होते. भारतीय आश्रमव्यवस्थेत जीवनाच्या या चारही अवस्था एकत्रितपणे नेतृत्व घडविण्याचे कार्य करत असत. त्या दिवशी एका दुपारी या चारही अवस्था एकाच सभागृहात एकत्र आल्या होत्या.

उदयन चळवळीची सुरुवात एका अशा विचारातून झाली आहे, जो कोणत्याही शैक्षणिक संस्थेपेक्षाही प्राचीन आहे : ‘राष्ट्रनिर्माण मनुष्यनिर्माण से होता है’, म्हणजेच राष्ट्राची उभारणी ही माणसाच्या सर्वांगीण विकासातून होते. गुरुकुल परंपरेत एखादा एकमेव शिक्षक नेता घडवत नसे, तर संपूर्ण समाज त्यासाठी योगदान देत असे. हाच परस्परावलंबनाचा विचार पुन्हा प्रस्थापित करणे आणि विविध पिढ्यांमध्ये धर्माधिष्ठित समृद्धी अर्थात अर्थसंपदा जपणारे समुदाय निर्माण करणे, हा उदयन चळवळीचा मुख्य उद्देश आहे. विकसित भारताच्या दिशेने जाण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

 

“यूएसएसएलचा पहिला संरक्षक म्हणून या विद्यार्थ्यांची क्षमता आणि ते काय करू शकतात, हे मी पाहिले आहे. मुंबईतील या बैठकीत मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे येथे मिळालेला पाठिंबा केवळ आर्थिक भांडवलापुरता मर्यादित नव्हता. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या व्यक्तींनी अशा तरुणांना आपला वेळ, अनुभवातून आलेला विवेक, मार्गदर्शन आणि आपलेपणाची भावना दिली, ज्यांनी अद्याप आपल्यासाठी काहीही मिळवलेले नाही. एखादा समाज आपल्या भविष्यामध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करत असतो.” – जयेश शाह, सामाजिक समता क्षेत्रातील उद्योजक आणि यूएसएसएलचे पहिले संरक्षक

 

या उपक्रमाची गरज मोठी आहे. २०४६ पर्यंत आजच्या बालकांपैकी आणि तरुणांपैकी सुमारे १४.५८ कोटी जण रोजगाराच्या शोधात असतील. कौशल्य विकासामुळे कुशल कामगार तयार होतात; मात्र रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक आहे. उदयन चळवळ यासाठी ‘संस्थाउभारणी करणारे युवा नेतृत्व’ हा पर्याय पुढे आणत आहे. इतरांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योग आणि संस्था निर्माण करण्यासाठी सक्षम युवा नेतृत्व घडविणे, हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे. पुढील दहा वर्षांत १,००० युवा संस्थानिर्माते घडविण्याचे उदयन चळवळीचे ध्येय आहे.

 

“भारताकडे तरुणांची कधीच कमतरता नव्हती; मात्र त्यांना घडविणाऱ्या समुदायाचा अभाव होता. शनिवारी हा समुदाय पुन्हा एकत्र येण्यास सुरुवात झाली.” – अनामिका दासगुप्ता, सामाजिक उद्योजिका आणि शिक्षणतज्ज्ञ; कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर आधारित भारतकेंद्रित नेतृत्व घडविण्याच्या उपक्रमाशी संबंधित

 

या चळवळीच्या केंद्रस्थानी पुण्यातील उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिप (यूएसएसएल) आहे. इयत्ता दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाच वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. वंडर स्कूल लर्निंग कलेक्टिव्ह या शैक्षणिक समूहाचा हा सर्वोच्च टप्पा असून, या समूहाच्या माध्यमातून तीन ते वीस वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविला जातो. तसेच, सुमारे दोन लाख विद्यार्थी आणि ५०,००० शिक्षकांसोबत पॉटर्स अर्थ फाउंडेशनने केलेल्या १५ वर्षांच्या कार्याचा भक्कम आधार या उपक्रमाला लाभला आहे.

यूएसएसएल ही ना स्टार्टअप इनक्युबेटर संस्था आहे, ना पारंपरिक व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी देणारा अभ्यासक्रम. कौटिल्याचे अर्थशास्त्र, न्याय दर्शन आणि भारताच्या गुरुकुल परंपरेवर आधारित नेतृत्व घडविण्याची ही एक कार्यपद्धती आहे. येथे केवळ शैक्षणिक कामगिरीपेक्षा विद्यार्थ्यांच्या चारित्र्याला आणि मूल्यांना अधिक महत्त्व देऊन निवड प्रक्रिया राबविली जाते. पुढील दहा वर्षांत १,००० युवा संस्थानिर्माते घडविण्याबरोबरच, त्यांच्या समुदायांमध्ये मार्गदर्शन मिळणारे आणखी ५,००० उद्योजक घडविण्याचे या चळवळीचे उद्दिष्ट आहे. ही यूएसएसएलची स्वतःची निश्चित केलेली उद्दिष्टे आहेत.

 

“सीएसआर क्षेत्रात आपण सहसा एखादा उपक्रम एका वर्षात काय परिणाम साध्य करेल, असा प्रश्न विचारतो. मात्र, उदयन चळवळ पुढील दहा वर्षांत एक संपूर्ण पिढी काय उभारेल, असा प्रश्न विचारते. हा अधिक व्यापक दृष्टिकोन आहे आणि अधिक चांगली गुंतवणूकही आहे. कारण ही गुंतवणूक केवळ एखाद्या उपक्रमात नसून, अशा नेतृत्वामध्ये आहे जे निधी संपल्यानंतरही टिकून राहतील अशा संस्था निर्माण करेल.” – सौरभ शर्मा, सीएसआर आणि सामाजिक प्रभाव क्षेत्रातील रणनीतीकार

 

या उपक्रमाचे पहिले फलित प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपात दिसू लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून यूएसएसएलच्या विद्यार्थ्यांनी विकसित भारत २०४७ संदर्भातील दस्तऐवजांचा अभ्यास केला, कायदा आणि प्रशासन या विषयांवरील व्याख्यानांना उपस्थिती लावली, उद्योग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभ्यासवर्गांमध्ये सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष समस्या ज्या समुदायांमध्ये आहेत, तेथे जाऊन क्षेत्रीय संशोधन केले.

या अभ्यासातून त्यांनी ‘सप्तधारा’ या सात राष्ट्रीय सामर्थ्याच्या प्रवाहांशी संबंधित अनेक उद्योगकल्पना विकसित केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या सात प्रवाहांचा आराखडा मांडला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी पुढील संकल्पना मांडल्या आहेत :

अन्नगती (अन्नसुरक्षा आणि अन्नपुरवठा व्यवस्था) — सुरक्षित आणि अतिरिक्त अन्नसाठा पोषणाच्या दृष्टीने असुरक्षित शहरी समुदायांपर्यंत पोहोचविणे आणि त्याचवेळी स्थानिक महिलांसाठी उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे.

बीजस्वराज (शेती आणि बियाण्यांचे स्वावलंबन) — शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या मूल्याचा अधिकाधिक लाभ त्यांनाच मिळावा, यासाठी मदत करणे.

दिशासेतू (युवकांचे कौशल्य आणि करिअर मार्गदर्शन) — केवळ गुणांच्या आकड्यांपलीकडे जाऊन तरुणांना योग्य दिशा, त्यांच्या कौशल्यांचा ठोस पुरावा आणि आर्थिक व्यवहारांचे भान देणे.

फिशलूप्स (नील अर्थव्यवस्था आणि चक्रीय पुरवठा साखळी) — पुण्यातील बाजारपेठांमध्ये फेकून दिल्या जाणाऱ्या माशांच्या कचऱ्यातून पुन्हा उपयुक्त मूल्य निर्माण करणे.

व्हॉइस ऑफ काजू (महिला, पोषण आणि शाश्वतता) — काजूच्या टाकाऊ फळांचा आणि कवचांचा वापर करून संपत्ती निर्माण करणे, तसेच या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी महिलांना सुरक्षितता, कौशल्य आणि मालकी हक्क उपलब्ध करून देणे.

प्रत्येक संकल्पनेची तीन निकषांवर पडताळणी केली जाते : ती नैतिक आहे का, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का आणि सर्व संबंधित घटकांसाठी कायदेशीर व न्याय्य आहे का?

या प्रत्येक संकल्पनेला संशोधनाच्या टप्प्यापासून प्रत्यक्ष कार्यरत सामाजिक उद्योगाच्या स्वरूपात आणण्यासाठी हा संस्थापक गट विद्यार्थ्यांसोबत सातत्याने काम करणार आहे.

 

 

 

 

 

“अर्थशास्त्राची सुरुवात सत्ता किंवा अधिकारापासून होत नाही, तर अंतर्गत सामर्थ्यापासून होते. स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शिस्त म्हणजेच ‘इंद्रियजय’. एखादी व्यक्ती नेतृत्व करण्यापूर्वी तिच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित होणे आवश्यक असते. अनेक वर्षांपासून मी हा विचार मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर आणि संचालक मंडळांमध्ये मांडत आलो आहे. या उपक्रमात आम्ही हाच विचार तरुणांच्या प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर लागू केला. विशेष म्हणजे, या तरुणांनी अर्थशास्त्रातील मूलभूत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे : आपली संकल्पना आपल्या धर्माशी आणि मूल्यांशी सुसंगत आहे का? ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? आणि तिचा ज्यांच्यावर परिणाम होईल, त्या प्रत्येकासाठी ती हितकारक आहे का?” – राजेश कामथ, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नेतृत्व मार्गदर्शक; कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील विचारांना

आधुनिक व्यवस्थापनाशी जोडणारे

उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिप आणि पॉटर्स अर्थ फाउंडेशनविषयी

पुण्यातील उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिप ही इयत्ता दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षांची पूर्णवेळ नेतृत्व विकास आणि रोजगारक्षमता वाढविणारी अभ्यासक्रम योजना आहे. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची दोन वर्षे आणि पदवी महाविद्यालयाची तीन वर्षे अशा एकूण पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची निवड कठोर आणि सखोल निवड प्रक्रियेद्वारे केली जाते.

स्रोत : संयुक्त राष्ट्रसंघाचा आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग (यूएन डीईएसए), जागतिक लोकसंख्या संभाव्यता अहवाल २०२४; सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय), नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण २०२३-२४; नीती आयोग, विकसित भारत @ २०४७ साठी कौशल्य विकासाचा पुनर्विचार (अमृत पात्रामधील गणनेनुसार

).

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments