Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*स्वरसंध्येत अवतरले स्वर्गीय सूर*  प्रख्यात गायक महेश काळे यांचा 'महेश काळे...

*स्वरसंध्येत अवतरले स्वर्गीय सूर*  प्रख्यात गायक महेश काळे यांचा ‘महेश काळे लाईव्ह कॉन्सर्ट’ कार्यक्रम ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४० वा वर्धापनपदिन ; बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महोत्सवास विनामूल्य प्रवेश

पुणे : सूर निरागस हो… या हृदयाचा ठाव घेणाऱ्या सादरीकरणाने गुढीपाडव्याच्या संध्येला अवघा परिसर निनादून गेला. प्रख्यात गायक महेश काळे यांच्या सह श्रोत्यांनी देखील वाद्यांच्या तालावर ‘मोरया मोरया’ चा जयघोष केला आणि सूर सुमनांनी रसिकांची ओंजळ भरली. भक्तीसंगीत, नाट्यगीतांच्या सादरीकरणासह शास्त्रीय गायनाची परिपूर्ण मेजवानी रसिकांना मिळाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महोत्सवाचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात केले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, गायक महेश काळे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राग यमन सादर करीत महेश काळे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सादर झालेल्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुण वर्गाने देखील संख्येने हजेरी लावली होती.

महेश काळे म्हणाले, पाडव्याच्या दिवशी माझ्या शहरात गातोय, याचा आनंद आहे. ज्या देवाची लहानपणापासून पूजा करत आलोय. त्याची आरती करुन दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या महोत्सवात गायला मिळतय याचा आनंद आहे, त्याबद्दल ट्रस्टचे आभार त्यांनी मानले.

दि. १३ एप्रिल पर्यंत हा दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत संगीत महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments