Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळीनिमित्त उमेद स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांचे प्रदर्शनाचे आयोजन*

दिवाळीनिमित्त उमेद स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांचे प्रदर्शनाचे आयोजन*

 

 

पुणे, दि. 30: उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे दिवाळी सणानिमित्त विशेष प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत एसजीएस मॉल, कॅम्प परिसर, पुणे येथे आणि 2 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अप्पर आयुक्त प्रांजल शिंदे यांनी दिली आहे.

 

स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी आपल्या कौशल्यातून व मेहनतीतून तयार केलेल्या विविध दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळावा, महिलांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच त्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. प्रदर्शनामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव व नांदेड अशा 13 जिल्ह्यातील समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

 

पुणे व परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या सुगंधी व हर्बल साबण, अभ्यंग तेल, उटणे, नांदेडची शेवग्यापासून बनविलेली विविध उत्पादने तसेच लाडू, चकली, अनारसे इत्यादी दिवाळीच्या फराळासाठी लागणारी तयार पिठे, चिवडा, चकलीचे मसाले, कापडी पर्स व पाऊच, मुलांनी तयार केलेल्या किल्ल्यांवर ठेवण्यासाठी मातीचे मावळे, मातीची पर्यावरणपुरक भांडी, महाबळेश्वरचा प्रसिद्ध मध, सांगलीचे प्रसिद्ध बेदाणे, कोल्हापूर चंदगडचे काजू, हिंगोली व सांगलीची भौगोलिक मानांकन प्राप्त हळद, सोलापूरचा प्रसिद्ध मका चिवडा, शेंगा चटणी व कडक भाकरी, लातूरची हस्तनिर्मित गोधडी व कापडी खेळणी, जालन्याची प्रसिद्ध मेंढीच्या लोकरीपासूनची उत्पादने, धाराशिवमधील भूमचा खवा व पेढा आदी विविध उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, असे आवाहन श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments