पुणे. 2 नोव्हेंबर, २०२६ : फोर्स मोटर्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत आणि पहिल्या सहामाहीत दमदार कामगिरीची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. नवीन उत्पादन पोर्टफोलिओ, ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती मागणी यामुळे कंपनीच्या व्यवसायाला गती मिळाली आहे.
उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्याच्या धोरणांतर्गत कंपनीने नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज आणि अर्बनिया डिलक्स बाजारात आणली आहे. या दोन्ही उत्पादनांना ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून ऑर्डर्समध्येही वाढ झाली आहे. या नवीन उत्पादनांच्या संक्रमण प्रक्रियेदरम्यान उत्पादन आणि कामकाजात काही आवश्यक बदल करण्यात आले होते. मात्र, कंपनीच्या मजबूत उत्पादन क्षमता आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे हे संक्रमण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून गेल्या दोन महिन्यांत विक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
ट्रॅव्हलर एन रेंज, अर्बनिया डिलक्स, ट्रॅक्स, मोनोबस आणि विशेष वाहनांसह कंपनीच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. याशिवाय कंपनीने आपली कर्जमुक्त आर्थिक स्थिती कायम राखली आहे.
फोर्स मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन फिरोदिया म्हणाले, की नवीन उत्पादनांच्या सादरीकरणामुळे कंपनीच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. आगामी काळात ट्रॅव्हलर ईव्ही रेंजच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील पर्यायांचा विस्तार करण्यावर भर राहणार आहे.
कंपनीने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जवळपास ३,००० कोटी रुपयांची नियोजित गुंतवणूक केली असून, उत्पादन दुप्पट करून वार्षिक सुमारे ८० हजार वाहनांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच ‘प्रोजेक्ट डिजीफोर्स’च्या माध्यमातून डीलर नेटवर्क, ग्राहकांशी थेट संवाद आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. आगामी सहामाहीत वाढती मागणी पूर्ण करणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे हे कंपनीचे प्रमुख प्राधान्य राहणार आहे
.


