*नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी खुले; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भाविकांना मिळणार सर्वंकष माहिती*
*प्रवास नियोजन, पर्वणी स्नानाच्या तारखा, धार्मिक स्थळे, निवास, आरोग्य सुविधा आणि सुरक्षाविषयक माहिती एकाच व्यासपीठावर;*
*संकेतस्थळाचा देशभर व्यापक प्रसार करण्याचे प्राधिकरणाचे आवाहन*
नाशिक, दि. ३ नोव्हेंबर २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभपर्व २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधित अधिकृत, विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी खुले केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून कुंभमेळ्याचे नियोजन, पर्वणी स्नानाच्या तारखा, धार्मिक स्थळे, वाहतूक व्यवस्था, निवास, आरोग्य सुविधा आणि सुरक्षाविषयक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in
३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभपर्वाच्या तयारीला औपचारिक प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना कुंभयात्रेचे नियोजन करणे सुलभ व्हावे, तसेच कुंभमेळ्याशी संबंधित माहिती अधिकृत माध्यमातून उपलब्ध व्हावी, हा संकेतस्थळ निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. भाविकांसह शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील घटक आणि प्रसारमाध्यमांसाठीही हे संकेतस्थळ महत्त्वपूर्ण माहितीचे केंद्र ठरणार आहे.
*कुंभयात्रेचे नियोजन होणार अधिक सुलभ*
सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक परंपरा, प्रमुख मंदिरे, घाट, आखाडे आणि धार्मिक स्थळांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा आणि भाविकांसाठी आवश्यक सूचनांनाही यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय, स्थानिक वाहतूक व्यवस्था तसेच प्रवास नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना कुंभयात्रेपूर्वीच आवश्यक नियोजन करणे शक्य होणार आहे.
*आरोग्य, निवास आणि सुरक्षाविषयक माहितीही मिळणार*
कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची माहितीही या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, निवास व्यवस्था, वाहनतळ आणि मदत कक्ष यांचा समावेश असेल. आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सार्वजनिक सुरक्षेसंबंधी सूचना उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.
संकेतस्थळाच्या सुविधांचा विस्तार टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, आगामी काळात अधिक माहिती, डिजिटल सेवा आणि भाविकांसाठी उपयुक्त सुविधांची भर घालण्यात येणार आहे.
*अधिकृत माहितीच्या प्रसारासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे*
सिंहस्थ कुंभमेळा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा धार्मिक-सांस्कृतिक सोहळा असल्याने त्याच्या नियोजनात विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक, धार्मिक संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळाची माहिती देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
शासकीय विभागांची संकेतस्थळे, समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती, जनजागृती मोहिमा, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील संस्था, धार्मिक संस्था आणि निवास व्यवस्था पुरविणाऱ्या व्यावसायिकांच्या माध्यमातून संकेतस्थळाची लिंक व्यापक प्रमाणात प्रसारित करता येणार आहे. प्रसारमाध्यमांनीही सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित बातम्या आणि माहिती प्रकाशित करताना या अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*डिजिटल माध्यमातून कुंभमेळ्याची माहिती जगभर पोहोचणार*
सिंहस्थ कुंभपर्व हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे जागतिक स्तरावर दर्शन घडविणारे पर्व आहे. या पार्श्वभूमीवर अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून भाविकांना अचूक माहिती मिळण्यासोबतच कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती देश-विदेशात पोहोचण्यास मदत होणार आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
भाविकांनी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित अधिकृत माहिती व अद्ययावत सूचनांसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिकृत संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in


