Tuesday, November 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedवस्ती भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद* *ना....

वस्ती भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद* *ना. चंद्रकांतदादांची कोथरुडकरांसोबत अनोखी दिवाळी!*

 

 

*वस्तीतील कुटुंबांना भेटी, चिमुकल्यांना खेळणी-खाऊचे वाटप*

 

दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध, नवे कपडे आणि आनंदाने उजळलेले चेहरे. मात्र, या आनंदाची खरी मजा तेव्हाच, जेव्हा तो इतरांच्याही आयुष्यात उजेड निर्माण करतो. हाच विचार मनात ठेवून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची दिवाळी कोथरुडमधील वस्ती भागातील कुटुंबांसोबत साजरी केली. त्यांच्या या अनोख्या दिवाळीने अनेक घरांमध्ये आनंदाची फुले उमलली, तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य या भेटीचे खरे समाधान ठरले.

 

दिवाळीच्या निमित्ताने चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडमधील विविध वस्ती भागांना भेटी दिल्या. तेथील कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांना दिवाळीचा फराळ, लहान मुलांना खाऊ आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले. हातात नवी खेळणी मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक या दिवाळीचे खरे आकर्षण ठरले.

 

या भेटी केवळ फराळ किंवा भेटवस्तूंच्या वाटपापुरत्या मर्यादित नव्हत्या. तर समाजातील प्रत्येक घटकाला सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा एक प्रेमळ प्रयत्न होता. रोजच्या धावपळीत आणि परिस्थितीच्या मर्यादांमध्ये सण साजरा करणाऱ्या कुटुंबांसाठी दादांची ही भेट आपुलकीचा दिलासा देणारी ठरली.

 

मात्र, या दिवाळीतील सर्वांत भावूक आणि प्रेरणादायी क्षण वेगळाच होता. दुष्काळग्रस्त भागातील गरजू बांधवांना मदत करण्यासाठी काही चिमुकल्यांनी आपापल्या पिगी बँक चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी साठवलेले पैसे दुसऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा या बालमनांचा निर्णय उपस्थितांची मने जिंकणारा ठरला.

 

या चिमुकल्यांच्या मोठ्या मनाचे कौतुक करत चंद्रकांतदादांनी त्यांनी दिलेला पैसा योग्य ठिकाणीच खर्च केला जाईल, अशी ग्वाही दिली. या छोट्या हातांनी दिलेली मदत रकमेने कदाचित लहान असेल; पण त्यामागची भावना मात्र खूप मोठी आहे. स्वतःच्या आनंदापलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवण्याचा संस्कार या मुलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments