Friday, November 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजना व मासेमारी परवाना सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन*

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजना व मासेमारी परवाना सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन*

 

 

पुणे, दि.१३: मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास करणे, मत्स्यव्यवसायिकांचे उत्पन्न वाढविणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना सेवांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांचे एकत्रिकरण करून “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” राज्यात राबविण्यास ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकूण २८ योजनांना मान्यता असून, त्यापैकी २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

तसेच मच्छिमारांना मासेमारी परवाना वितरण ही सेवाही GPR अंतर्गत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाडीबीटी २.० (https://mahadbt2.maharashtra.gov.in/) या पोर्टलवर विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

या सुधारणांमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून, ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. विविध शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहितीची स्वयंचलित पडताळणी होणार असून, मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच सेवांची प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

 

राज्यातील सर्व मत्स्यशेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक व मच्छिमार संस्थांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर आधार क्रमांकाच्या आधारे महाआयडी तयार करून योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे येथे “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष” स्थापन करण्यात आला असून महाआयडी तयार करणे किंवा ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अर्चना शिंदे यांनी केले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments