Sunday, November 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात कलेचे चिरंतन मूल्य जपण्याची जाणीव हवी पद्मश्री वासुदेव...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात कलेचे चिरंतन मूल्य जपण्याची जाणीव हवी पद्मश्री वासुदेव कामत; महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त साहित्य रंगरेषा संमेलनाचे आयोजन

 

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात आपण काय गमावत आहोत, याची जाणीव असली पाहिजे. निसर्गाने आपल्याला दिलेली कला ही केवळ विरंगुळा किंवा मनोरंजनासाठी नाही. कलाकृती अधिक काळाचे आयुष्य घेऊन जन्माला आलेली असते. त्यामुळे कलाकार, लेखक आणि साहित्यिकांनी आपल्या निर्मितीचा चिरंतनपणा लक्षात घेऊन विचार केला पाहिजे. आपण जे निर्माण केले आहे, ते दीर्घकाळ टिकणार आहे, याची जाणीव असणे आवश्यक आहे, असे मत चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांनी व्यक्त केले.

 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (पुणे २०२७) पूर्वतयारीनिमित्त आयोजित साहित्य रंगरेषा संमेलनात ते बोलत होते. चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सतीश कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, शाहीर हेमंत राजे मावळे, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. समर्थ युवा फाउंडेशन संयोजित या संमेलनाला मराठी भाषा विभाग, संस्कार भारती (पश्चिम महाराष्ट्र) आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले.

 

पद्मश्री वासुदेव कामत म्हणाले, साहित्य आणि चित्रकारांचा पुस्तक छपाईपुरता संबंध व्यावहारिक असला, तरी व्यवसाय आणि व्यवहार इतिहासात नोंदले जात नाहीत. कलेच्या माध्यमातून आपण काय देत आहोत आणि त्यातून कोणते मार्गदर्शन होत आहे, याचे भान कलाकारांनी ठेवले पाहिजे. अन्यथा त्याचे दीर्घकाळ दुष्परिणाम होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, नवरसांमध्ये बीभत्स हा एक रस आहे. प्रत्येक कलानिर्मितीमध्ये नवरसांचे प्रमाण किती ठेवावे, याची मर्यादा असते. त्याचे परिणाम सकारात्मक कसे दिसतील, याचाही विचार केला पाहिजे.

 

डॉ. उमा कुलकर्णी म्हणाल्या, मुखपृष्ठ चित्रकार असाइनमेंट म्हणून काम करत असला, तरी तो उच्च दर्जाचा कलाकार असतो. गंभीर वाचक मुखपृष्ठ पाहून पुस्तक घेतो की नाही, हा प्रश्न असला तरी तो लेखकाचे नावही पाहतो. वाचकाला आकर्षित करण्याचे काम मुखपृष्ठ करते. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढविण्याचे काम मुखपृष्ठ चित्रकार करतात. ही जबाबदारी ते वर्षानुवर्षे पेलत आले आहेत.

 

चित्रकार सुहास बहुळकर म्हणाले, चित्रकारांचे साहित्य क्षेत्रातील योगदान खूप महत्त्वाचे आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी साहित्य क्षेत्रासाठी चित्रांकन केले आहे. मात्र, आधुनिक चित्रकारांच्या चर्चेत त्यांच्या योगदानाचा पुरेसा उल्लेख होत नाही. पुस्तकासाठी उत्तम चित्रांकन करणाऱ्या चित्रकाराला योग्य श्रेय मिळणे आवश्यक आहे. लेखकासोबत चित्रकाराचे नावही पुस्तकावर असले पाहिजे. चित्रांकन कलेचे महत्त्व गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे.

 

सतीश कुलकर्णी म्हणाले, या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. सुरुवातीच्या काळात पुस्तकनिर्मिती झाली, तेव्हा मुखपृष्ठ छापणे हा कसोटीचा भाग होता. सुरुवातीला टंकलेखनाची पुस्तके आणि त्यानंतर ब्लॉक प्रिंटिंगची मुखपृष्ठे असा प्रवास झाला. पुढे चित्रकारांनी प्रगती केली आणि मुखपृष्ठ निर्मितीसाठी त्यांना अधिक वाव मिळाला. चित्रकार आणि शिल्पकार ही समाजाला मिळालेली देणगी आहे. ते समाजाचा आरसा म्हणून काम करतात. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असले, तरी तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत. ते तंत्रज्ञानही तुम्हालाच चालवायचे आहे.

 

संमेलनात ‘बोलकी मुखपृष्ठे’ या विषयावर पहिले सत्र झाले. यामध्ये राधा आंबेकर यांनी विचार मांडले. चित्रकार रविमुकुल यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले. ‘माणसे – शब्द आणि चित्रे’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये प्रवीण जोशी, चिंतामणी हसबनीस, मिलिंद मुळीक आणि चारुहास पंडित सहभागी झाले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. प्रशांत कुलकर्णी

यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments