पुणे, दि. १८:
पुणे शहरातील उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेच्या प्रतिभावान विद्यार्थिनींनी जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
36 व्या पुणे जिल्हा रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये सानवी सागर जाधव हिने क्वाड्स (Quads) प्रकारात तीन सुवर्णपदके पटकावली. 16 ते 18 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विमान नगर स्केटिंग रिंक, पुणे येथे ही जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. 8 ते 10 वर्षे वयोगटातील सानवीने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. याच स्पर्धेत शाळेच्या इयत्ता तिसरी ‘ब’ मधील वर्णिका दाडिगा हिनेही चमकदार कामगिरी करत दोन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक मिळवले. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. वर्णिकाने यानंतर सीबीएसई 2026-27 अंतर्गत आयोजित रोलर स्केटिंग स्पर्धेतही उल्लेखनीय यश मिळवले. बेंगळुरू येथील केंगेरीमधील अविन इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या या स्पर्धेत क्वाड्स अंडर-9 गटातील रोड वन लॅप प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
विद्यार्थिनींच्या या चमकदार यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी, अनिष्का मालपाणी आणि प्राचार्या शारदा राव यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या छोट्या खेळाडूंच्या यशाने संपूर्ण पुण्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


