Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार*

*महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार*

 

 

*कर्ज योजनांचा परिणाम जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रम; लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. २० : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून योजनांचा लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर झालेला परिणाम, व्यवसायाची सद्यस्थिती, रोजगार व उत्पन्नातील वाढ तसेच कर्ज परतफेडीची स्थिती याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

 

महामंडळाची स्थापना १० जुलै १९७८ रोजी झाली असून, मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा महामंडळाचा प्रमुख उद्देश आहे. या उद्देशपूर्तीसाठी महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.

 

या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व योजनांचे परिणाम मूल्यमापन करण्याचा विशेष उपक्रम महामंडळाने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘प्रायमोव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि.’ या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश विविध योजनांतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेणे हा आहे. लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचा कोणत्या व्यवसायासाठी वापर केला, त्यांच्या व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नामध्ये किती वाढ झाली, योजनांचा त्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम झाला, तसेच कर्ज परतफेडीची सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे.

 

सर्वेक्षणादरम्यान महामंडळाच्या विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. तसेच कर्ज वितरणानंतर व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

 

महामंडळाच्या संबंधित जिल्ह्यांतील कर्ज योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे नियोजन अधिक प्रभावी करणे तसेच लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

 

*सर्वेक्षणादरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास संपर्क :*

 

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे – ४११००६. दूरध्वनी : ०२०-२९७०३०५८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एल. काची यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments