Saturday, November 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी; परिशिष्ट-ब व...

*अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी; परिशिष्ट-ब व परिशिष्ट-क भरावे**

 

 

पुणे, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान काही कारणास्तव घरी अनुपस्थित असलेले किंवा कामानिमित्त परदेशात गेलेले मतदार तसेच पत्ता बदलल्यामुळे मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट न होऊ शकलेले मतदार यांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित मतदारांनी आवश्यकतेनुसार परिशिष्ट-ब किंवा परिशिष्ट-क भरून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

एसआयआर प्रक्रियेदरम्यान प्रगणकांकडून गणना अर्जाचे (एन्युमरेशन फॉर्म) वाटप करण्यात येत असताना काही मतदार कामानिमित्त परदेशात गेले होते किंवा मतदार यादीत नमूद केलेल्या पत्त्यावर उपलब्ध नव्हते. अशा मतदारांना परिशिष्ट-ब भरून पुन्हा अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

 

तसेच, ज्या मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा दुबार (एएसडीडी) या वर्गवारीत समाविष्ट झाल्यामुळे मसुदा मतदार यादीत आलेली नाहीत आणि जे मतदार आता मतदार यादीतील जुन्या पत्त्यावर राहत नसून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, त्यांनी परिशिष्ट-क भरावे.

 

अशा मतदारांनी पुण्यातील जुन्या मतदार यादीत नमूद असलेल्या पत्त्याच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून परिशिष्ट-क प्राप्त करून घ्यावे आणि स्थलांतरित झालेल्या नवीन ठिकाणी ते सादर करावे. यामुळे संबंधित मतदाराचे नाव नवीन ठिकाणच्या मतदार यादीत समाविष्ट होण्यास मदत होईल. यासाठी नमुना क्रमांक ८ भरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

आपल्या भागातील बीएलओ कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘बुक अ कॉल विथ बीएलओ’ या सुविधेचा वापर करता येईल. तसेच, एएसडीडी यादी पुणे जिल्हा प्रशासनाच्या **asddlist.pune.gov.in** या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

मतदारांनी आपल्या परिस्थितीनुसार योग्य ते परिशिष्ट भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments