Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedवन-भूमि हस्तांतरणात ग्रामसभा संमती अनिवार्य वनवासी कल्याण आश्रमाने केले स्वागत 

वन-भूमि हस्तांतरणात ग्रामसभा संमती अनिवार्य वनवासी कल्याण आश्रमाने केले स्वागत 

 

 

नवी दिल्ली, ता. २३ : जनजाति क्षेत्रातील भूमिअधिग्रहण आणि वन-भूमि हस्तांतरणात ग्रामसभांची संमती अनिवार्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होईल. आश्रमाचे अध्यक्ष सत्येन्द्र सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘बिबोल टोप्पो व इतर विरुद्ध ओडिशा राज्य व इतर’ प्रकरणात हा निकाल दिला. ‘नियामगिरी / वेदांता’ (१८ एप्रिल २०१३) खटल्यातील ऐतिहासिक निकालाची आठवण सत्येन्द्र सिंह यांनी करून दिली. त्या निर्णयानंतरही केंद्र व राज्य सरकारांकडून ‘पेसा’ (PESA) कायदा आणि खासगी कंपन्यांसाठीच्या वन-भूमि वाटपातील तरतुदींकडे दुर्लक्ष होत होते. ताज्या निर्णयाने या तरतुदींवर शिक्कामोर्तब केले आहे.

 

– विकासाला विरोध नाही :

जनजाति समाज किंवा कल्याण आश्रम देशाच्या विकासाच्या विरोधात नाही. मात्र, वन, पर्यावरण नष्ट करून किंवा जनजातींच्या शोषणाच्या किमतीवर विकास नको, असे आश्रमाने म्हटले आहे. अनेक कंपन्या खनन प्रकल्पांत पर्यावरण व जलप्रदूषण रोखण्याचे उपाय राबवत नाहीत. तसेच स्थानिकांना दिलेल्या आश्वासनानुसार रोजगारही देत नाहीत. कंपन्यांच्या नफ्याच्या लालसेवर पंतप्रधानांनीही ‘फिक्की’च्या कार्यक्रमात भाष्य केल्याचा दाखला निवेदनात दिला आहे. आर्थिक विकासासोबत स्थानिक परिसर आणि नागरिकांचा विकास झाल्यास जनजाति समाज प्रकल्पांना सहकार्य करेल. कायदेशीर मार्गाऐवजी काही कंपन्या भ्रष्ट अधिकारी, राजकारणी आणि दलालांच्या मदतीने मागच्या दाराने कामे करून घेण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

 

पाचव्या अनुसूचीतील दहा राज्यांच्या राज्यपालांनी राज्य सरकारांना या आदेशाचे शब्दशः व कायद्याच्या भावनेनुसार पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती कल्याण आश्रमाने केली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाने (NCST) पुढाकार घ्यावा. तसेच संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करावी; अन्यथा न्यायालयाच्या अवमानास जबाबदार धरले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे. प्रसारमाध्यमांनीही संवेदनशीलता दाखवत या निर्णयाचा प्रसार करावा. प्रकल्पांत ग्रामसभा संमतीची पडताळणी करून संबंधित बातम्यांना प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments