पुणे : पाणी वाचवा… पृथ्वी वाचवा… चा संदेश देत पुष्परंगावली आणि आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आयोजित दीपोत्सवात तब्बल ५१ हजार दीप प्रज्वलित करण्यात आले. आकर्षक रंगातील फिरत्या पणत्यांसह मंदिरातील आकर्षक सजावट पाहण्यास देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याचे आयोजन केले आहे. उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ही आरास करण्यात आली. विश्वकर्मा विद्यालय व विश्वकर्मा युनिर्व्हसिटी यांचे शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संयोजनात सहभाग घेतला.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरच आपल्या आयुष्यात आनंदरूपी प्रकाश प्रज्वलित होऊ शकतो. त्यामुळे यंदा बळीराजावर आलेले संकट दूर होऊन सर्वांच्या आयुष्यात आनंदरूपी प्रकाश यावा, अशी प्रार्थना दीपोत्सवातून देवीचरणी करण्यात आली. तसेच विविधरंगी दीप प्रज्वलित करुन संपूर्ण मंदिराप्रमाणे समाजातील अज्ञानरुपी आणि विकाररुपी अंध:कार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील मातेचरणी करण्यात आली.


