पुणे, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी बारामती शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत किंवा मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत आवश्यकतेनुसार काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
स्पर्धेची सुरुवात रेल्वे स्टेशन ग्राउंड भिगवण रोड बारामती येथे सुरू होऊन पेन्सिल चौक विमानतळ मार्गावरून भारत फोर्स, फरेरो कंपनी ते कटफळ स्टेशन येथून यूटर्न घेऊन परत त्या मार्गाने रेल्वे स्टेशन ग्राउंडवर समाप्त होणार आहे.
*वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग*
बारामती शहरातील भिगवणकडे जाणारी तसेच भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक तीन हत्ती चौक, माळावरची देवी, जळोची आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच विद्या प्रतिष्ठानच्या मागील बाजूने ग.दि.मा. सभागृह, अभिषेक कॉर्नर, रुईपाटी मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. पाटस रस्त्यावरील देशमुख चौकाकडून येणारी वाहतूक रेल्वे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर यू-टर्न घेऊन रेल्वे रुळालगतच्या मार्गाने मेहता हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल मार्गे एमआयडीसीकडे वळविण्यात येणार आहे.
पाटस रोडवरील पालखी महामार्गावरून डावीकडे विमानतळाच्या बाजूने जाणाऱ्या वाहतुकीसाठी पालखी मार्ग, रेल्वे सर्कल आणि नवीन पालखी मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भिगवण रोडवरून पाटसकडे जाणारी वाहतूक नवीन पालखी मार्ग, रेल्वे सर्कल आणि पुढील चारपदरी पालखी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
तीन हत्ती चौक, पेन्सिल चौक ते मेडिकल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या चौकापर्यंतचा दोन्ही बाजूंचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या परिसरातील रहिवाशांची वाहतूक मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवरून सुरू राहील.
मेडिकल कॉलेज चौक ते फरेरो कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पियाजो कंपनीच्या बाजूकडील मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तीन हत्ती चौक ते पंचायत समिती चौक, बारामती मुख्य रस्ता तसेच सर्व्हिस रोड मॅरेथॉन स्पर्धेच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेच्या कालावधीत नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच वाहतूक पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
००००


