एमआयटी डब्ल्यूपीयूत ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
पुणे, दि. २६ नोव्हेंबर : “आपल्या भावना, विचार आणि मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होतो. शरीरातून मिळणाऱ्या संकेतांचा मनावर होणारा प्रभाव म्हणजेच मन-शरीर समन्वय होय. यामुळे तणाव कमी होतो आणि दैनंदिन ऊर्जा व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येते. मन आणि शरीर यांचा समन्वय साधला की आयुष्य अधिक निरोगी आणि समाधानी वाटू लागते.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रविराजा एन. सीथाराम यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन अँड एनर्जी मॅनेजमेंट’ या विषयावर ते बोलत होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरू डॉ. निलेश अरोरा, डॉ. दत्ता दंडगे, डॉ. दीपक पराशर आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
डॉ. रविराजा एन. सीथाराम म्हणाले, “मन आणि शरीर यांचा समन्वय साधला की आरोग्य आपोआप सुधारते. या दोघांचा घनिष्ठ संबंध असतो. मन शांत आणि सकारात्मक असेल तर शरीरही त्याच अनुषंगाने कार्य करते. संशोधनानुसार मानसिक ताण-तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. झोपेचा त्रास होतो आणि पचनतंत्र बिघडते. याउलट मन प्रसन्न आणि तणावमुक्त असेल तर शरीरात हार्मोन्सचा समतोल राखला जातो. त्यामुळे आरोग्य सुधारते. ध्यान, योगसाधना, सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शरीर निरोगी राहते. मन आणि शरीर यांचा समतोल म्हणजे केवळ शारीरिक हालचाली नाहीत तर भावनिक स्थैर्य आणि मानसिक स्पष्टताही आवश्यक असते. आपण जे विचार करतो तसेच आपल्या शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे रोजच्या आयुष्यात मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा.”
त्यानंतरच्या सत्रात प्रसिद्ध लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘संतांच्या विचारांचे आधुनिक वारसदार’ या विषयावर मत मांडताना सांगितले की, संत ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी अद्वितीय कार्य केले आहे. परंतु आजच्या जेन-झीने त्यांचा आदर्श घ्यावा. आधुनिक युगात डॉ. बाबा आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मनोहर डोळे, ज्ञानेश्वर बोडके यांसारख्या शेकडो महान व्यक्तींना आधुनिक संतांची उपमा दिली जाऊ शकते. त्यांनी आपल्या कार्यातून मानवता सेवा सिद्ध करून दाखविली आहे.दुपारच्या सत्रात डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी लोकमान्यांचे गीतारहस्य या विषयावर विचार मांडले .उत्तम कर्म मार्गी आपल्या देशात घडावे यासाठी त्यांनी गीतारहस्य लिहिले . वर्तमान काळात गीतेची उपाययोजना समजून घेणे आवश्यक आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी डॉ. नितीन खेडकर, डॉ. पारुल जाधव, डॉ. विक्रांत गायकवाड आणि डॉक्टर प्रशांत माळवदकर मंचावर उपस्थित होते.
डॉ. सचिन गाडेकर यांनी सूत्रसंचालन व डॉ. आशिष कठाळे व डाॅ. विक्रांत गायकवाड यांनी आभार मानले.


