नेदरलँड्स, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधींचा सहभाग; विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद
पिंपरी, दि. २६ नोव्हेंबर २०२६: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांची, आधुनिक शैक्षणिक सुविधांची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी अॅडियन (Adyen) फिनटेक कंपनी आणि युनिसेफ (UNICEF) यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाने पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली. या प्रतिनिधी मंडळामध्ये नेदरलँड्स, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथील प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी प्रतिनिधींनी शाळेतील वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण व्यवस्था, ग्रंथालय, खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि STEM प्रयोगशाळांची पाहणी करून शाळेच्या शैक्षणिक कार्याची माहिती घेतली.
महापालिकेच्या शाळांमध्ये महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, पायाभूत सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती प्रतिनिधी मंडळाला दिली.
महानगरपालिका शिक्षण अधिकारी संगीता बंगार यांनी शाळांचे प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन व्यवस्था आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी महापालिका शाळांमधील शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम आणि शैक्षणिक प्रगती यांचे सादरीकरण करण्यात आले. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती विकसित करणे, खगोलशास्त्र प्रयोगशाळेद्वारे अवकाश विज्ञानाची गोडी निर्माण करणे तसेच STEM प्रयोगशाळांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती प्रतिनिधींनी जाणून घेतली.
विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलांचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सांस्कृतिक विविधतेला व्यासपीठ मिळाले. तसेच शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यावर आधारित एक नाटक विद्यार्थ्यांनी संपूर्ण इंग्रजीत सादर केले. प्रतिनिधी मंडळाने विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांसोबत प्रतिनिधीमंडळाचा मुक्त संवाद
भेटीचा विशेष भाग म्हणजे प्रतिनिधी मंडळ आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेला मुक्त संवाद. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नेदरलँड्समधील शिक्षणपद्धती कशी आहे, तेथील शाळांमध्ये कोणत्या प्रकारे अध्यापन केले जाते, भारत आणि नेदरलँड्समधील शिक्षणव्यवस्थेत कोणते फरक आहेत, तेथील विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात, अशा विविध प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने विचारणा केली. प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची ओळख होण्याबरोबरच जागतिक स्तरावरील शैक्षणिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली.
शिक्षकांसोबत विविध विषयांवर चर्चा
त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने शिक्षकांशी संवाद साधून अध्यापनाच्या विविध पद्धती, आधुनिक शिक्षणतंत्र, अभ्यासक्रमाची रचना व अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि त्यामागील विविध कारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. शिक्षकांनी आपल्या अनुभवांच्या आधारे शाळेतील शैक्षणिक वातावरण, अध्यापनातील नव्या पद्धती आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांची माहिती दिली. या चर्चेतून विविध देशांतील शिक्षणपद्धती, अध्यापन तंत्र आणि शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण झाली.
या भेटीदरम्यान अॅडियन मुख्यालयाच्या सामंथा फिगुएरोआ, फेडेरिको फुस्को, मीरा ब्रँडसम, अॅडियन इंडियाच्या रूपा मित्तल आणि आदित्य खुल्लर, युनिसेफ नेदरलँड्सच्या मार्लोस ब्लूमर्ट, टिम कूप्स आणि स्कॉट कारेल, युनिसेफ इंडियाच्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्री, साधना पांडे, राधिका श्रीवास्तव, सयेम मेहमूद आणि संजय सिंह तसेच युनिसेफ महाराष्ट्राच्या मानसी आचार्य, श्रीविद्या मेंढळे, श्रुती गणपत्ये आणि शिखा राणा उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्या वतीने शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर, प्रशासन अधिकारी संगीता बंगार, पर्यवेक्षिका ज्योती तापकीर, एससीईआरटीचे गणित विभागप्रमुख मनीष यादव, शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्र. ५४ च्या मुख्याध्यापिका गीतांजली पोळ आणि पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग मूडगुण यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोगाधारित शिक्षण, डिजिटल सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत झालेल्या संवादामुळे शिक्षण क्षेत्रातील जागतिक अनुभव, नव्या संकल्पना आणि अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण
करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.


