पुणे : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे.
संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे.
पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६३ वे वर्ष साजरे होत आहे. बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.
शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. मंगळवार, दिनांक २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.


