पुणे – शेकडो वर्षांपूर्वी भगवान महावीर यांनी दिलेले विचार आजही जीवंत आहेत येणाऱ्या समस्यांचे निराकरण हवे असेल तर भगवान महावीरांच्या विचारांवर चालले पाहिजे. तेच आपल्यासाठी आदर्श आहेत. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.
तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त हिंदी विवेक प्रकाशित ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच गोयल गार्डन येथे झाले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महावीर वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाला उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषीजी महाराज, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, सुहाना प्रवीण मसालेवालेचे संचालक विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया उपस्थित होते.
आंबेकर पुढे म्हणाले की, मानव कल्याणासाठी केलेली तपस्या जन्मोजन्मातरची साधना आहे. राष्ट्राची साधना हजारो वर्षांची आहे. विदेशींच्या आक्रमणात संत महात्म्यांनी आपल्या विचारातून राष्ट्राला मजबूत बनवले. आपल्या पूर्वजांनी मानव कल्याणाच्या विचारांवर विश्वास ठेवून विदेशी संकटांपासून राष्ट्राला वाचविले. संघर्ष काळात राष्ट्राच्या जीवन मूल्यांना आत्मसात केले या मूल्यांना आत्मसात केल्यानेच व्यक्ती चरित्रवान होतो. एकता, संस्कृती, भौतिक सांस्कृतिक संपन्नता महत्त्वाची आहे. अशा कार्यात आपण सहभागी होऊन याच मार्गावर चालावे असे आवाहन त्यांनी केले. संतांचे वचन, विचार विवेकने परिश्रमाने सर्वांसमोर ठेवले त्याबद्दल आंबेकर यांनी विवेक मासिक पत्रिकेच्या परिवाराचे अभिनंदन केले.
निरंतर कार्य महत्त्वाचे
जैन तपस्वी उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषिजी महाराज यांनी सत्ता आणि शास्त्राच्या आधारे विजय मिळवणारे जगात खूप देश आहेत, परंतु भगवान महावीर हे असे नाव आहे ज्यांनी सत्याच्या आधारे विजय मिळवला. त्यामुळे ते सर्वांपेक्षा खूप अनोखे आणि वेगळे आहेत. सर्व धर्म आम्ही श्रेष्ठ असल्याचा दिंडोरा पिटतात, त्यातूनच विश्वाचे कल्याण आहे असे संदेश देतात, परंतु या विचारांना शेवटपर्यंत पोहोचवणारे भगवान महावीरच आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. विवेकच धर्म आहे आणि त्यातूनच विश्वकल्याण आहे. विवेक हाच धर्म असून ही प्रस्तुती तात्पुरती नसून निरंतर घडली पाहिजे. महावीरांनी आपल्याला भोजनातूनही अहिंसा शिकवली आहे, कर्तव्य आज एक, उद्या वेगळे आहेत त्यामुळे निरंतर कार्य महत्त्वाचे. महावीरांचे विचार हे एका दिवसासाठी नसून ते 365 दिवस निरंतर चालणारे आहेत, भगवान महावीरांचे विचार एका दिवसापुरते सीमित न राहता निरंतर वेळोवेळी जगासमोर आणण्याचे आवाहन त्यांनी केले. महावीरांचे दिव्य दृष्टिकोन जगासमोर पोहोचले पाहिजेत यासाठी हिंदी विवेकने आपले कार्य चालू ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांच्या हस्ते उपाध्यय प. पू. प्रवीण ऋषि महाराज यांना ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
पद्मश्री रमेश पतंगे यांनी यावेळी जैन समाजाचे महत्त्व सांगितले. प्रत्येक देशाचे एक वेगळी ओळख असते अमेरिका भौतिक साधन संपन्न देश आहे, ब्रिटनला मदर पार्लमेंट म्हणतात अशाच प्रकारे भारताला मात्र धर्मभूमी म्हणून ओळखली जाते. ती टिकवून ठेवण्यासाठी संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले. वेद काळापासून आजपर्यंत धर्मभूमी बनवून ठेवण्यात महावीरांचे कार्य अग्रणी आहे. राष्ट्रीय व्यक्तित्व बनविण्यासाठी महापुरुषांचे योगदान मोठे आहे असे सांगत पद्मश्री पतंगे यांनी भगवान महावीरांच्या विचारांवर चालणाऱ्या अहिंसा विचाराचे महत्त्व विशद केले. संविधानातील आर्टिकल 21 आपल्याला कशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणाचीही हत्या करता येत नाही. प्रत्येकाने अहिंसेचे पालन केले पाहिजे हे भगवान महावीरांचे विचार आजही संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवर सुनील आंबेकर, विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया तसेच सुजय शाह, परेश शाह, अनिल नाहर, राजेंद्र बाठिया, प्रकाश धोका, वर्धमान शाह यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विशेषांकाच्या यशस्वीतेसाठी सहयोग देणारे डॉ. दिलीप कुलकर्णी यांनाही गौरविण्यात आले.
विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. विवेक ग्रंथ, विशेषांक, पुस्तक आदीच्या माध्यमातून राष्ट्र विचारांचे बीज वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहे. प्रत्येक समाज तसेच विस्मृत होत चाललेल्या महत्त्वपूर्ण साहित्याला पुन्हा झळाळी देण्याचे काम हिंदी विवेक उत्तरोत्तर करीत राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पल्लवी अनवेकर यांनी केले. प्रशांत मानकुमरे यांनी आभार मानले.


