पुणे : एप्रिलमध्ये परीक्षा संपली की उन्हाळ््याच्या सुट्टीमध्ये मुलांना ओढ लागते, ती मामाच्या गावाची. मामाच्या गावाला जाऊन आंबे, कै-या, बोरं, आवळे अशा रानमेव्याचा आनंद घेत सुट्टी घालविण्याचे बेत आखले जातात. अशीच ही मामाच्या गावाची सफर वंचित आणि विशेष मुलांना अनुभविता यावी, याकरीता शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व पुणेकरांच्या सहभागाने मामाच्या गावची सफर हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यासोबतच दृष्टीहिन जोडप्यांचा विवाह सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार पेठेत सेवा मित्र मंडळ चौकात दि. ७ ते १२ मे पर्यंत हा सोहळा होणार आहे, अशी माहिती सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, रोहन जाधव, वैभव वाघ, आनंद सराफ, अमर लांडे, अॅड.हेमंत झंझाड, विक्रांत मोहिते, तन्मय तोडमल, पंकज पारवे आदी उपस्थित होते.
मामाच्या गावची सफर या उपक्रमासोबतच दृष्टीहिन असलेल्या जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या समवेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मामाच्या गावची सफर या उपक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी (२५) वर्ष आहे.
विवाहपूर्व मेहंदीचा कार्यक्रम बुधवार, दि. ८ मे रोजी सायंकाळी ७ होणार आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त स्मरणिका तयार करण्यात आली असून प्रकाशन बुधवारी सायंकाळी होणार आहे. तर, रविवार, दि. १२ मे रोजी साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरदेवाची वरात दुपारी ४.३० वाजता व विवाहाचे धार्मिक विधी होणार आहेत. मुख्य विवाह सोहळा सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गणेश सांगळे म्हणाले, मामाच्या गावच्या सफरीची सुरूवात मंगळवार, दि.७ मे रोजी दुपारी ४ वाजता होणार असून या दिवशी भाचे मंडळींचे स्वागत होणार आहे. बँड, बग्गी, उंट, घोडे, मिकी माऊस हे भाचे मंडळीच्या स्वागताला येणार आहेत. बुधवार, दि.८ मे रोजी मुलांना वॉटर पार्क आणि विविध प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविण्यात येणार आहे. तर, गुरुवार, दि. ९ मे रोजी पुण्यातील धार्मिक स्थळांना भेटा त्यानंतर जादूचे प्रयोग, कटपुतली खेळ, बालनाटय, चित्रपट तसेच विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी ५ वाजता समारोप होणार आहे.
शुक्रवार, दि.१० मे रोजी अक्षय्यतृतीयेला मंदिर वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी व सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार, दि.११ मे रोजी मंदिर परिसरात आरोग्य शिबीर व भारतीय वारकरी मंडळातर्फे भजन होणार आहे. अनाथ आश्रमातील मुले-मुली मामाच्या गावच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आतुरतेने वाट पहातात. दोन ते तीन दिवस भाचे मंडळी मुक्कामी असतात. अनाथ आणि विशेष मुलांना मामाच्या गावी येऊन सुट्टीमध्ये मजा करता यावी, यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. पुण्यातील आपलं घरं, संतुलन पाषाण, श्रीवत्स, वंचित विकास, बचपन वर्ल्ड फोरम, माहेर, संकल्प वसतिगृह – पारधी समाज विकास संस्था, ममता फाऊंडेशन, संस्कार विद्यार्थी गृह राशीन आदी संस्थातील मुले सहभागी होणार आहेत. पुणेकरांचा या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत असून पुणेकरांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यां
नी केले.


