डॉ. एस. एन. पठाण, महाराष्ट- राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक, राष्ट-संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, तर अखिल भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (ख.उ.उ.ठ. न्यू दिल्ली) उपाध्यक्ष व एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ म्हणून साऱ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.
समाजात सामाजिक सलोखा राहावा व ज्ञानेश्वर माऊलींचा ‘आता विश्वात्मक देवे‘ हा संदेश जगामध्ये जावा म्हणून गेली अनेक वर्षे ते डॉ. विश्वनाथ कराड यांच्या बरोबर ‘सांप्रदायिक सद्भावाच्या‘ कार्यात सतत अग‘ेसर आहेत व यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, वारीचे यथार्थ वैज्ञानिक विश्लेषण करणारा त्यांचा हा लेख.
पायी वारीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पाल‘यांबरोबर आज लाखो वारकरी पंढरपूरला पायी जात आहेत. रस्त्यात या वारकर्यांची शिस्त, विठ्ठलाच्या प्रती असणारा त्यांचा निष्काम भाव, मुखी नाम, ‘ग्यानबा तुकाराम’ चा गजर करत विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ हे सर्व पाहणे देखील अत्यंत पुण्यशील कर्म समजले जाते. असा हा वारकरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक असतो. या सामान्य वारकर्यांच्या चित्तशुद्धीचा व निष्काम कर्माचा विज्ञाननिष्ठ प्रयोग संत तुकाराम महाराजांनी भक्तिच्या मार्गे जनतेला दिला आहे व त्याचा आता आषाढी एकादशी निमित्ताने अध्यात्मिक उत्सव सुरू आहे.
भक्ति आणि कर्माची सांगड
तुकोबांनी सर्वांनाच भक्तीचा अधिकार असल्याची घोषणा केली. ‘सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे॥’ असे भक्तीचे स्वरूपही आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. तुकोबांनी केवळ भक्तीचाच डांगोरा पिटला आणि कर्माला दांडी मारली असे नाही. तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. भक्ती ही अज्ञातवासात किंवा एकांतात किंवा डोंगरदर्यात किंवा देवळातच केली पाहिजे, असे आवश्यक नाही. कर्म करताना कोणत्याही स्थळीकाळी भक्ती करता येते. भक्तीमुळे निष्काम कर्मही करता येते, माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध झाल्या की कर्म हे कर्तव्य म्हणून करणे शक्य होते. कर्माला कर्तव्य मानले की कर्माच्या फळाची आशाही सुटते. फळाची चिंता मिटते. भक्तीचा संबंध हा मनुष्याच्या मनोपिंडाशी असतो. भक्तीच्या माध्यमाने भक्त हा देवरूप होतो. अशीच माणसे समाजाच्याही उद्धाराचे काम करतात. भक्तीची प्रक्रिया ही विज्ञाननिष्ठ प्रकिया असून समाजाच्या चित्तशुद्धीचा इहवादी कार्यक्रम म्हणून तुकोबांनी भक्तिमार्ग समाजासमोर मांडला होता. स्वतःच्या अनुभवाने तुकोबांनी तो सिद्धही केला. भक्तीचा आणि मनाचा संबंध असतो म्हणून मनावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण॥
भक्तिचे व्यावहारिक स्वरूप
तुकोबांनी नवविधा भक्तीचेही स्वरूप स्पष्ट केलेले आहे. पूर्वसुरींच्या संतांनीही नवविधा भक्तियोगाचे प्रतिपादन केले होते. नवविधा भक्तीयोग पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर आणण्याचे श्रेय मात्र, तुकोबांनाच दिले पाहिजे. ज्याचे नामस्मरणात चित्त जडलेले आहे अशाच लोकांचे अंकित व्हावे, दास व्हावे, असे तुकोबांना वाटते. ज्याला नवविधा भक्ती करता येते त्याचेच अंतःकरण शुद्ध होते. चित्तवृत्ती प्रसन्न आणि आनंदित होतात. जीवनातले परमोच्च असे भक्तीसुखही त्याला प्राप्त होते.
नानाविध भक्तीचे स्वरूप
देवाचे स्मरण, नामसंकीर्तन, श्रवण, नामोच्चार, अहंकारनिरसन, मनीमानसीपूजन, दास्यभाव, आत्मसमर्पण, स्वभाव अशी ही नवलक्षणांनी युक्त असलेली भक्ती म्हणजे नवविधा भक्ती होय. हाच भक्तियोग वारीत साधला जातो. नवविधा भक्ती जो जाणतो आणि साक्षात ह्या नवलक्षणांनी युक्त अशी भक्ती करतो, तोच खरा भक्त आणि देव होय. भक्तीचा भौतिक प्रभाव मांडतानाही तुकोबा विज्ञानाचा आधार घेऊन, भक्तिमार्ग हा पूर्णपणे वैज्ञानिक असल्याचे सांगतात. ‘नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रिया व्यापार नाठवती॥ भक्ती हे सोपे वर्म असल्याचे सांगतात. परंतु लगेच तुकोबा भक्ती ही अत्यंत कठीण अशी शुळावरची पोळी असल्याचेही प्रतिपादन करतात. भक्तीसाठी मनाचा कठोर निर्धार आवश्यक असतो आणि सर्व विकार विकृतींचाही त्याग करावा लागतो. शुद्ध अंतःकरणानेच भक्तीच्या समाधीकडे प्रवास करणे शक्य असते.
संतांनी समाजात समत्व आणि ममत्व निर्माण केले
संतांनी भक्तिमार्ग आणि एकेश्वर विठ्ठलाचे निर्गुण ध्यान रूप समाजाच्या पारलौकिक कल्याणासाठी सांगितले होते. समाजाला भक्तिमार्गी करून, समाजाचे चित्त शुद्ध करून समाजात समत्व आणि ममत्व निर्माण करण्याचा इहवादी कार्यक्रम संतांनी राबविला.
सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांतता आवश्यक
आजचा काळ हा ग्लोब व्हिलेजच्या प्रगतीचा कालखंड आहे. परंतु एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील प्रगतीच्या ह्याच कालखंडात धार्मिक उनमादाने केवळ भारतातच नव्हे तर जगभर हैदोस घातल्याचे दिसून येते. धर्म आणि भाषेच्या प्रश्नांपेक्षा रोजच्या जगण्याचे प्रश्न त्याला भेडसावीत आहेत. रात्रंदिन तो जगण्याशी झुंजत आहे. एकूण आपल्या भारतीय समाजात सध्या सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेचा प्रश्न मूलभूत बनलेला आहे.
संतांनी अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितले
संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून; समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. ‘नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा’, ही संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.
वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा विज्ञान निष्ठ कार्यक‘म
संतांचा विचार हा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ आणि सर्वधर्मसमभावात्मक मानवतावादी विचार आहे. सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेच्या जगण्याचे मौलिक तत्त्वज्ञान आहे. आजच्या ह्या सांप्रदायिक अशांतता आणि दहशतवादाच्या विषाणुयुक्त भूमीवर संतविचारांची आणि संतमार्गाची पेरणी केल्यानेच जगात विश्वशांती आणि सद्भाव निर्माण होऊ शकेल. हाच मंत्र गेली 30 वर्षे विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे चे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड राबवित आहेत.
विश्वशांतीचे कार्य
दिंड्यांमधील पायी चालणारे वारकरी वाखरी तळावर पोहचले की, वारकर्यांना विसावा हवा असतो. म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी वाखरी येथे अत्यंत सुंदर “विश्वशांती गुरूकुल” स्थापन केले. वारकर्यांसाठी 200 स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली. येथे एक विशेष भव्य स्वागत कमान उभारून व्यासपीठावर प्रा. डॉ. कराड सर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वारकर्यांचे स्वागत करतात. जवळ जवळ 1 लाख वारकर्यांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येते. येणार्या प्रत्येक दिंडी प्रमुखाचे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येणार्या महिला वारकर्यांचा शाल, पुष्पहार देऊन प्रा. डॉ. विश्वनाथ कराड स्वागत करतात. असा हा पायी चालणार्या वारकर्यांच्या चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. जणू तो आध्यात्मिक उत्सवच असतो.
विश्वशांती गुरूकूल, वाखरी-पंढरपूर येथे दिंडी प्रमुखांचा सत्कार करताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डावीकडून डॉ. एस. एन. पठाण,
सौ. उषा कराड, श्री. काशीनाथ कराड, श्रीमती शशिकला केंद्रे, डॉ. विश्वनाथ कराड, मा. जितेंद्रसिंग गायकवाड, श्री. तुळशीराम कराड आणि मान्यवर.
लेखक माजी कुलगुरू व आळंदी
येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक
आणि सल्लागार आहेत.
संपर्क 9822362603


