पुणे, दि. २५ : जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या प्रलंबीत प्रकरणांचा विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर आढावा घेऊन तीन महिन्यांत प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण आयुक्त प्रविण पुरी, सहआयुक्त पूनम मेहता, जिल्हा सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास, समाज कल्याण सहआयुक्त सुरेंद्र पवार, बार्टीच्या उपायुक्त वृषाली शिंदे, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांची प्रलंबीत प्रकरणांची तातडीने दखल घेऊन ते सोडविण्यासाठी सर्व संबंधितांनी विशेष प्रयत्न करावे असे सांगून अधिनियमान्वये अनुज्ञेय लाभ देण्याच्या आणि सफाई कामगारांच्या तक्रारी वेळेत सोडविण्याच्या सूचना श्री.व्यंकटेशन यांनी केल्या.
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना विविध शासकीय कार्यालयात प्राधान्याने नोकरी देण्याच्या शासन निर्णयाची तसेच त्यांच्या सफाई कामगार वेतनश्रेणीतील वेतन निश्चिती करण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी विनाविलंब करण्याची सूचना त्यांनी केली. विविध शासकीय विभागात नियुक्तीची प्रकरणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई, थकीत वेतन, सेवाविषयक प्रकरणे यासह अन्य प्रकरणांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्व समस्या आणि त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
०००


