*
पुणे : इतिहास प्रेमी मंडळ आणि सुराज्य सर्वांगिण विकास प्रकल्पाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ततेची शताब्दी जयोस्तुते गीताचे समूहगान करुन शालेय विद्यार्थी साजरी करणार आहेत. येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारात शनिवार, दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता समूहगीतातून सावरकरांना आगळीवेगळी मानवंदना दिली जाईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानची काळ्यापाण्याची शिक्षा भोगून काही काळ रत्नागिरी व नंतर पुण्याच्या येरवडा कारागृहात बंदी होते. जनतेच्या दबावामुळे सरकारने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला, तब्बल १४ वर्षांची कष्टप्रद शिक्षा भोगून ६ जानेवारी १९२४ साली ते येरवडा तुरुंगातून मुक्त झाले. या घटनेला शनिवारी १०० वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने समता बालक मंदिर प्रशालेतील विद्यार्थी समूहगान करुन मानवंदना देण्यास सहभागी होणार आहेत. तरी पुणेकरांनी देखील मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे


