Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थितीचा संयुक्त सराव यशस्वी

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थितीचा संयुक्त सराव यशस्वी

 

 

 

 

पुणे, दि. 6 : संभाव्य औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीत विविध औद्योगिक आस्थापना, शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय, तत्परता व आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी कुरकुंभ, ता. दौंड, औद्योगिक वसाहतीमध्ये आज संयुक्त आपत्कालीन सराव यशस्वीरीत्या पार पडला.

 

सहसंचालक श्री. सुधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सरावामध्ये अमोनिया वायूची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अमोनिया वायूची गळती होऊन गुडलक चौक परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे काल्पनिक दृश्य तयार करण्यात आले. या परिस्थितीला अनुसरून बचावकार्य, प्रथमोपचार, जखमींचे स्थलांतर, अग्निशमन, वाहतूक नियंत्रण, परिसर सुरक्षित करणे तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.

 

सरावामध्ये चार जखमींची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. सहभागी पथकांनी निर्धारित वेळेत घटनास्थळी पोहोचून श्वसन संरक्षण संच, सुरक्षा पथक, प्रथमोपचार पथक, अग्निशमन पथक, रुग्णवाहिका आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावी वापर करत नियोजित पद्धतीने कार्यवाही केली.

 

या संयुक्त सरावामध्ये क्लीन फिनो केम लि., अल्काइल अमाइन्स, सिप्ला, एटर्निस, एमक्युअर, ऑनर लॅब, कारगिल, हेनकेल, हार्मनी ऑरगॅनिक्स प्रा. लि. तसेच कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील इतर औद्योगिक आस्थापनांनी सक्रिय सहभाग घेतला. व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), अग्निशमन विभाग आणि संबंधित स्थानिक यंत्रणांनी सरावाच्या नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

सरावानंतर सहभागी विभाग आणि औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक व समारोप चर्चा घेण्यात आली. यामध्ये सरावादरम्यान करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींना अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक सुधारणा, परस्पर समन्वय आणि संवादव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.

 

यावेळी व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक श्री. अंकुश खराडे आणि प्रादेशिक अधिकारी श्री. हनुमंत पाटील यांनी सांगितले की, “औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी केवळ उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध असणे पुरेसे नाही. जलद निर्णयक्षमता, प्रभावी संवाद, परस्पर समन्वय आणि नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे. अशा संयुक्त सरावामुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी जीवित व मालमत्तेची हानी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक तयारी अधिक सक्षम करता येते.”

 

या सरावामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिनिधी श्री. विठ्ठल बनोटे, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. प्रवीण पाटील, श्री. विष्णू सांगोलकर, श्री. महेंद्र सावंत, श्री. विनोद मदुरकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय पेटकर, दौंड पोलीस प्रशासनाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. गवळी, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, स्थानिक प्रशासन तसेच विविध औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

 

सर्व सहभागी यंत्रणा व औद्योगिक आस्थापनांनी दाखविलेला सक्रिय सहभाग, उत्तम समन्वय आणि तत्पर प्रतिसाद यामुळे संयुक्त आपत्कालीन सराव यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments