पुणे : योग्य औषधी योग्य वेळेत वापरली की जे समाधान चिकित्सेमध्ये मिळते ते खूप मोठ्या प्रमाणात औषधी वापरून मिळत नाही. बरोबर निदान केले, बरोबर द्रव्य वापरले आणि रुग्णाला लगेच बरे वाटले की त्याचे समाधान मिळते. स्वांतसुखाय चिकित्सा हा प्रकार वैद्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रॅक्टिस ही सतत आनंददायी राहते. वैद्यांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. वैद्यांनी सतत नवीन औषधांते संशोधन करत रहायला हवे, असे मत प्रख्यात वैद्य धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार आयुर्वेद वाचस्पती वैद्य प्रयाग प्रदीप सेठीया यांना प्रदान करण्यात आला. पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात पुरस्कार सोहळा झाला. ज्येष्ठ नामांकित वैद्य धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वैद्य लक्ष्मण लावगनकर, वैद्य गार्गी लावगनकर, वैद्य माधव भागवत, वैद्य केदार जोशी, कौशिक शेंड्ये, सुखदा शेंड्ये आदी उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी यांचे ‘पक्षवध व्याधी मध्ये विविध कल्पांचा अवस्थेनुरूप विचार’ या विषयावर व्याख्यान झाले.
वैद्य धनंजय कुलकर्णी म्हणाले, आयुर्वेदिक औषधे सगळी सारखी असतात, जास्त घेतली तरी काही फरक पडत नाही, असे म्हटले जाते. परंतु ते चुकीचे आहे. योग्य वेळी योग्य औषधे वापरली तर आपण यशस्वी वैद्य व्हाल, असेही त्यांनी सांगितले
वैद्य प्रयाग सेठिया म्हणाले, मला मिळालेला पुरस्कार हा माझ्या गुरु परंपरेच्या प्रतिनिधी म्हणून स्विकारतो. हा पुरस्कार म्हणजे अजून आयुर्वेदातील कार्य करण्याची महत्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्य लक्ष्मण लावगनकर म्हणाले, आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य जगणाऱ्या कै. वैद्य चंद्रकांत यांनी वैद्य परंपरेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तम उत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे, असेही त्यांनी सांगितले. वैद्य देवाशीष उंब्रजकर यांनी सूत्रसंचालन केले. वागीश्वरी खानापुरकर यांनी आभार मा
नले.


