योग्य पोषण प्रदान करण्याच्या मुलभूत भूमिकेपलीकडे स्तनपानाचे फायदे असतात असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.केईएम हॉस्पिटल पुणे येथील एनआयसीयू विभागाचे प्रमुख व नवजात शिशुतज्ञ डॉ.उमेश वैद्य म्हणाले की,स्तनपानामुळे केवळ तत्काळ पौष्टिक गरजा पूर्ण होत नाहीत,तर आजीवन आरोग्य आणि संज्ञानात्मक प्रगतीचा पायाही घातला जातो.
सर्वसाधारपणे ओळखल्या जाणाऱ्या फायद्यांमध्ये लहान मुलांच्या वाढीला आधार देणे,प्रतिकारशक्ती वाढवणे यांचा समावेश होतो.परंतु चयापचय आरोग्य,संज्ञानात्मक विकास आणि ॲलर्जी प्रतिबंध यासारख्या गोष्टींवर स्तनपानाचा प्रभाव तितकाच महत्त्वाचा आहे.या सामान्यपणे कमी ज्ञात असलेल्या फायद्यांपैकी एक म्हणजे मेंदूच्या विकासामध्ये स्तनपान हे महत्त्वाची भूमिका बजावते.लाँग चेन पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस आणि लेप्टीनसारख्या आईच्या दूधातील पोषक आणि बायो ॲक्टिव्ह घटक संज्ञानात्मक कार्य आणि उच्च आयक्यू स्कोअर्ससाठी लक्षणीय योगदान देतात.याशिवाय निरोगी आतड्यांसाठी मायक्रोबायोटाच्या विकासामध्ये मदत होते,ज्यामुळे मेंदूचे आरोग्य आणखी चांगले राहते.
मेंदूच्या विकासात योगदान देण्याव्यतिरिक्त मेटाबोलिक सिंड्रोम आणि ॲलर्जीचा धोका कमी करण्यामध्ये स्तनपानाचा प्रभाव हा त्याचे व्यापक संरक्षणात्मक आणि विकासात्मक फायदे अधोरेखित करतात.
केईएम हॉस्पिटल पुणे येथील लॅक्टेशन कन्सल्टंट जान्हवी शहा म्हणाल्या की,स्तनपानाविषयी जागरूकता वाढविणे हे एकंदर सार्वजनिक आरोग्य आणि येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
केईएम हॉस्पिटल पुणे येथील लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ.राणी बालगुडे म्हणाल्या की, हे फायदे केवळ लहान मुलांसाठी आरोग्यदायी सुरूवातच नव्हे तर माता आणि मुले या दोघांच्याही दीर्घकालीन आरोग्य कल्याणासाठी योगदान देतात.
डॉ.उमेश वैद्य पुढे म्हणाले की,केईएम हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू आणि मातांच्या काळजीसाठी प्रगत सुविधा आहेत.यामध्ये अद्ययावत एनआयसीयू आणि मिल्क बँकसह गेल्या वर्षी सुरू केलेल्या लॅक्टेक्शन क्लिनिकचा समावेश आहे.


