Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल पुणे येथे

केईएम हॉस्पिटल पुणे येथे

 

पुणे, २३ ऑगस्ट २०२४ : केईएम हॉस्पिटल पुणे येथे आज अद्ययावत नेक्टर ह्युमन मिल्क बँक सुरु करण्यात आली आहे. याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांच्या हस्ते करण्यात आले. सन्माननीय अतिथी म्हणून केईएम हॉस्पिटल पुणे येथील बालरोग विभागाचे माजी संचालक डॉ.आनंद पंडित यांसह फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संचालक सौरभ धानोरकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल वाभी,केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय संचालक झक्सेस कोयाजी, वैद्यकीय प्रशासक डॉ.विश्‍वनाथ येमुल, केईएम हॉस्पिटल पुणे येथील एनआयसीयू विभागाचे प्रमुख व नवजात शिशुतज्ञ डॉ.उमेश वैद्य,लॅक्टेशन कन्सल्टंट जान्हवी शहा व डॉ.राणी बालगुडे आणि कर्मचारी सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही नेक्टर ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात आली आहे.

 

जास्तीत जास्त क्षमतेसह असलेली केईएम हॉस्पिटलमधील नेक्टर ह्युमन मिल्क बँक नवजात अतिदक्षता विभाग तसेच इतर रुग्णालयांमध्ये गरज असलेल्या बाळांसाठी वरदान ठरणार आहे. यामध्ये दात्यांकडून मिळणाऱ्या दुधाचे संकलन, चाचणी, पाश्चरायझेशन, साठवण आणि आवश्यकतेनुसार वितरण समाविष्ट आहे.

 

नेक्टर ह्युमन मिल्क बँकच्या उद्घाटन प्रसंगी पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी यावेळी आई-मुलाच्या नातेसंबंधाचे प्रतिबिंब असलेल्या तू कितनी अच्छी है हे सदाबहार सुरेल हिंदी गीताच्या ओळी सादर केल्या. तसेच ह्या उपक्रमाचे उद्घाटन करताना मला एक माता म्हणून खूप आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

१९८० साली केईएम हॉस्पिटल पुणे एनआयसीयू विभागाची स्थापना करण्यात बालरोग विभागाचे माजी संचालक डॉ.आनंद पंडित यांचा मोलाचा वाटा होता. त्या काळातील आठवणींना उजाळा देत एनआयसीयूचा विस्तार एका भक्कम प्रणालीत झाल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

याप्रसंगी बोलताना केईएम हॉस्पिटल पुणे येथील एनआयसीयू विभागाचे प्रमुख व नवजात शिशुतज्ञ डॉ.उमेश वैद्य म्हणाले की, नेक्टर ह्युमन मिल्क बँक ही मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना योग्य पोषण देण्यास आणि अनेक बालकांचे जीव वाचविण्यात मदत करेल. या अद्ययावत मिल्क बँकेमध्ये जास्तीत जास्त कार्य क्षमता असून यामध्ये अत्याधुनिक उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

 

श्री.धानोरकर यांनी गेल्या 24 वर्षांपासून आमच्या संस्थेतील लोकांना सेवेची अशी उदात्त संधी दिल्याबद्दल केईएम हॉस्पिटलचे आभार मानले.लोकांना परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फिनोलेक्स आणि एमएमएफ हे केईएम हॉस्पिटल सोबत सदैव तत्पर राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

डॉ.उमेश वैद्य पुढे म्हणाले की, २०१८ साली केईएम हॉस्पिटलमध्ये ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यात आली होती आणि आमच्या एनआयसीयूला याचा भक्कम आधार मिळाला आहे,जेणे करून अनेकांचे जीव वाचविता आले. ही अद्ययावत नेक्टर ह्युमन मिल्क बँक किफायतशीर दरात अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.या प्रयत्नात आमच्यासोबत सहकार्य केल्याबद्दल मुकुल माधव फाऊंडेशनचे मी आभार मानते.

 

केईएम हॉस्पिटल पुणे येथील लॅक्टेशन कन्सल्टंट जान्हवी शहा यांनी नेक्टर ह्युमन मिल्क बँक बाबत माहिती दिली आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ.राणी बालगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या दिपाली भंगारे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments