पुणे,२७ सप्टेंबर २०२४ : लैंगिक आरोग्याबद्दल असलेले गैरसमज, चुकीची माहिती यातून अनेक समस्या निर्माण होतात आणि चिंता वाढते. याचा सामना करण्यासाठी योग्य शिक्षण व जागरूकता करण्याची गरज आहे असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले. कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड इंटरनॅशनल (सीएसईपीआय) तर्फे 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान पीवायसी हिंदू जिमखाना येथे सेक्सकॉन 2024 या 40 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ह्युमन सेक्शुॲलिटी (मानवी लैंगिकता) क्षेत्रातील 250 हून अधिक तज्ञ सहभागी झाले असून परिषदेची संकल्पना डिजिटल युगातील लैंगिकता : तोटे आणि फायदे (सेक्शुॲलिटी इन द डिजिटल एरा : पिटफॉल्स ॲन्ड बेनिफिटस) या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
उदघाटनप्रसंगी प्रख्यात अभिनेते मोहन आगाशे, जे.जे.हॉस्पिटल,मुंबई येथील एआरटी सेंटरच्या माजी प्रमुख डॉ.अलका देशपांडे, लैंगिक चिकित्सा तज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी, सीएसईपीआयचे अध्यक्ष प्रा.डॉ.जी.वेंकट रमणा,सीएसईपीआयचे इमिरेटस अध्यक्ष प्रा.डॉ.डी.नारायण रेड्डी ,महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ.विंकी रुगवाणी, पुण्यातील वरिष्ठ व प्रसिध्द सेक्सोलॉजिस्ट आणि परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ.राजेंद्र साठे आणि सेक्शुअल मेडिसिन आणि एंड्रोलॉजी कन्सल्टंट आणि सीएसईपीआय 2024 चे आयोजन सचिव डॉ.अमित मुथा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. संजय देशपांडे आणि प्रा.डॉ.जी.वेंकट रमणा यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना लैंगिक चिकित्सा तज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी म्हणाले की, डॉक्टरांकडे जेव्हा रुग्ण लैंगिक समस्या घेऊन जातात तेव्हा प्रत्येक वेळी हे जाणवते की, या समस्यांमधून रुग्णांमध्ये प्रचंड चिंता आणि नकारात्मकता निर्माण होतात. यामुळे भीती,अपयश आणि न्यूनगंडाची भावना या दुष्टचक्रात ते अडकतात. या सगळ्या गोष्टी,गैरसमज आणि चुकीच्या गोष्टीतून निर्माण होतात,याचा सामना करण्यासाठी जागरूकता आवश्यक आहे.
डॉ.अलका देशपांडे म्हणाल्या की, लैंगिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर डिजिटल विश्वात काय सुरु आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत वैद्यकीय क्षेत्रात देखील जागरूकता निर्माण व्हायला हवी.
डॉ.राजेंद्र साठे म्हणाले की, परिषदेसाठी निवडण्यात आलेली संकल्पना ही आजच्या इंटरनेटच्या जगाशी संबंधित आहे. मानवी लैंगिकतेला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या युगात आपण जगत आहोत. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सादर केलेल्या संधी आणि आव्हानांचा सखोल विचार करण्यासाठी ही परिषद व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.
डॉ.अमित मुथा म्हणाले की, लैंगिक आरोग्य आणि तंदुरूस्तीच्या दृष्टीने डिजिटल माध्यमाद्वारे येणारी आव्हाने आणि संधी या दोन्हींचा सामना करण्याचे आमचे ध्येय आहे.
प्रा.डॉ.डी.नारायण रेड्डी यांनी डिजिटल जगामुळे निर्माण होणाऱ्या जोखमींवर भर दिला. डिजिटल तंत्रज्ञानाने निश्चितच आपले जीवन अधिक सुलभ बनवले आहे,मात्र यामुळे पोर्नोग्राफी आणि दिशाभूल करणारी माहिती देखील सहज उपलब्ध करून देणारी जोखीम देखील निर्माण केली आहे. अशा गोष्टी अयोग्य व चुकीच्या वर्तनांना चालना देऊ शकतात,ज्यामुळे सामाजिक जीवन धोक्यात येऊ शकते,असा इशारा त्यांनी दिला.
प्रा.डॉ.जी.वेंकट रमणा यांनी डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांची लैंगिकता व्यक्त करण्याच्या,माहिती मिळविण्याच्या आणि संबंध निर्माण करण्याच्या पध्दती कशा बदलल्या आहेत या गोष्टींवर प्रकाश टाकला. ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडिया,व्हर्च्युअल रिॲलिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतच्या डिजिटल युगाने लैंगिक अभिव्यक्तीमध्ये क्रांती केली आहे. या परिषदेतील आमचे उद्दिष्ट हे केवळ संभाव्य जोखीम ओळखणे नाही तर,या तंत्रज्ञानाचे फायदे आणि संधी शोधणे देखील आहे. लैंगिकता आणि डिजिटल युग यांच्यातील संबंधाची सखोल माहिती जाणून घेऊन या गुंतागुंतीच्या विषयाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे आणि लैंगिक आरोग्याला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा हेतू आहे.
मार्च 1982 मध्ये द कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड इंटरनॅशनल (सीएसईपीआय)ची स्थापना करण्यात आली,त्याच वर्षी मुंबईत पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.सुरूवातीला इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे 1991 मध्ये नामकरण करण्यात आले.गेल्या काही वर्षांमध्ये सीएसईपीआय आता मोठ्या संख्येने सदस्य असणारी भारतातील आघाडीची लैंगिक आरोग्य संघटना बनली आहे.
या परिषदेची स्थापना प्रख्यात सेक्सोलॉजिस्ट आणि वृत्तपत्र स्तंभलेखक कै.डॉ.महिंदर वत्स याबरोबरच डॉ.आर.एच.दस्तूर,डॉ.सी.एल.झव्हेरी,श्रीमती सरला मुखी,डॉ.एस्थर दुबे,डॉ.विठ्ठल प्रभू आणि डॉ.राज ब्रह्मभट्ट
यांनी केली.


