पुणे, 2 ऑक्टोबर २०२४ : तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेच्या वेल्हे-भोर परिसरातील अतिदुर्गम भागातील शिक्षण – ग्रामआरोग्य – ग्रामविकास – ग्राम-नगरसंगम उपक्रमांची माहिती सर्व देणगीदारांना द्यावी आणि त्यांच्याशी हितगुज करावे म्हणून नुकतेच गरवारे कॉलेज येथे ‘देणगीदार-हितचिंतक मेळावा’ पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली 38 वर्षे अविरतपणे संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा देणगीदारांना सादर केला तसेच 38 वर्षातील यशोगाथा देणगीदारांसमोर मांडल्या.या ‘देणगीदार-हितचिंतक मेळाव्यात संस्थेचे सचिव श्री मंदार अत्रे,विश्वस्त श्री उदय पुरंदरे, अध्यक्ष श्री उमेश देशपांडे, उपाध्यक्ष श्री प्रकाश मीठभाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, डॉ. सलील कुलकर्णी, श्री संदीप खरे, श्री सुनील देशपांडे, श्री प्रमोद खळदकर आणि श्री रमेश आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ.सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा बहुचर्चित आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सतत 21 वर्षे हा कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केल्याबद्दल या दोघांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


