मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२४ : सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस आणि स्पेनमधील एसएसजी मेट्रिक्स यांच्यातील संयुक्त कंपनी असलेल्या सुमीतएसएसजीने भारतात आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये परिवर्तन घडविणाऱ्या आपल्या काही योजनांची आज घोषणा केली. ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) १०८ रुग्णवाहिका’ हा प्रकल्प राज्यभरात राबविण्याचे या कंपनीने ठरविले असून याकरीता सुमारे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आरोग्याच्या गंभीर अशा आणीबाणीच्या काळात, म्हणजे ‘गोल्डन अवर’मध्ये या अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णांना वरदान ठरणाऱ्या आहेत. विशेष वैद्यकीय उपकरणांनी सज्ज अशा या रुग्णवाहिकांचा ताफा उभारण्याचे सुमीतएसएसजीचे लक्ष्य आहे.
या प्रगत रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल्स (एमडीटी), टॅबलेट पीसी, आरएफआयडी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रीयाज सिस्टीम यांसारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. याव्यतिरिक्त, त्यांच्यामध्य़े अंगभूत कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (सीआरएम), कॉम्प्युटर-एडेड डिस्पॅच (सीएडी), व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीटीएमएस) आणि पेशंट अरायव्हल इंटिमेटेशन सिस्टीम या प्रणालीही बसविण्यात आलेल्या आहेत.
कंपनीतर्फे उभारल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकांच्या ताफ्यात अत्याधुनिक जीवरक्षक रुग्णवाहिका (एएलएस), बेसिक जीवरक्षक रुग्णवाहिका (बीएलएस), नवजात शिशूंसाठीच्या रुग्णवाहिका, त्वरीत प्रतिसाद देणाऱ्या बाईक, समुद्र आणि नदीतून प्रवास करण्यासाठीच्या नौका रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. ‘एमईएमएस १०८’ या उपक्रमातील या ताफ्यात वैद्यकीय मदत पुरविणारे ड्रोन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणारे हेलिकॉप्टर यांचाही समावेश असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ पेरेझ कस्तीयोन यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय बैठकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. सांचेझ हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.
स्पेन व भारत यांच्यातील व्यापारविषयक शिखर परिषदेसाठी भारतात आलेले स्पेनचे पंतप्रधान सांचेझ यांनी मुंबईतील एमईएमएस १०८ उपक्रमातील नवीन रुग्णवाहिकांची वैयक्तिकरित्या पाहणी केली आणि त्याचे अनावरण केले. याप्रसंगी त्यांनी भारतातील प्रगत आरोग्यसेवा उपक्रमांच्या महत्त्वाबद्दल थोडक्यात सांगितले आणि हा उपक्रम पुढे नेणाऱ्या ‘सुमीतएसएसजी’च्या पथकाचे अभिनंदन केले. या पथकाशी केलेल्या संभाषणात सांचेझ यांनी भारतातील आरोग्यसेवांमधील सुधारणांची प्रशंसा केली. भारतातील आरोग्यसेवेमधील पायाभूत सुविधांच्या एकूण सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींसोबत आपल्या चर्चेचा सांचेझ यांनी यावेळी उल्लेख केला.
रुग्णवाहिकांच्या ताफ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना ‘सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे’ भारतातील उपप्रमुख सुमीत साळुंके म्हणाले, “स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ पेरेझ कस्तीयोन आणि त्यांचे व्यावसायिक शिष्टमंडळ यांनी आमच्या या उपक्रमाला भेट दिली, त्यांच्या या भेटीबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. आम्ही स्पॅनिश पंतप्रधानांना आमचा ताफा आणि नाविन्यपूर्ण सेवा यांची मॉडेल्स दाखवली. युरोपातील सर्वात मोठ्या रुग्णवाहिका सेवा ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या एसएसजीसह भागीदारीत ही मॉडेल्स आम्ही खास भारतीय बाजारपेठेसाठी विकसीत केली आहेत. या आमच्या भागीदारीत भारताच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) क्षेत्रात परिवर्तनीय बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. माझा ठाम विश्वास आहे की भारत-स्पेन संबंध मजबूत करण्यासाठी सुमीतएसएसजी हा उपक्रम एक गेमचेंजर ठरेल आणि पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांशी जुळवून घेऊन भारतातील बी-टू-जी सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून आणखी गुंतवणूक आकर्षित करेल.”
साळुंके यांच्या याच भावनांना प्रतिसाद देत स्पेनमधील ‘एसएसजी मेट्रिक्स एसएल’चे उपाध्यक्ष दिएगो प्रीएतो ज्युनियर म्हणाले, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पॅनिश व्यावसायिक शिष्टमंडळाला दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. या शिष्टमंडळात माझे वडील,‘एसएसजी मॅट्रिक्स’चे अध्यक्ष दिएगो प्रीएतो मार्तागॉन यांचा समावेश होता. भारतातील विकासाभिमुख धोरणांसाठी आणि आरोग्यसेवांच्या वाढीसाठी ते वचनबद्ध आहेत. ‘सुमीत ग्रुप’सोबतची आमची भागीदारी भारतात अर्थपूर्ण बदल घडवून आणेल आणि या भागीदारीचा जनतेला व्यापक फायदा होईल. मी महाराष्ट्र राज्याचे आणि या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे या नाविन्यपूर्ण ‘एमईएमएस १०८’ उपक्रमाबद्दल आभार मानतो. या उपक्रमातील प्रगत सुमीतएसएसजी रुग्णवाहिकांचा ताफा लवकरच संपूर्ण राज्यात सेवेत दाखल होईल.”
राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या या उपक्रमांतर्गत, रस्ते अपघात, गंभीर आजार, नैसर्गिक आपत्ती, तसेच आरोग्यविषयक आणीबाणी अशा विविध प्रसंगांमध्ये तातडीने सेवा देऊन रुग्णांचा जीव वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येतील.
या प्रकल्पातून भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये एक नवीन मानांकन स्थापित होईल. केवळ तांत्रिक प्रगती आणि कार्यान्वयनाची क्षमता एवढ्यापुरताच हा प्रकल्प आदर्श नसेल, तर भविष्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीमध्ये उत्कृष्ट सेवा देण्यासाठीचे एक शाश्वत मॉडेल म्हणूनदेखील हा प्रकल्प आदर्श नमुना ठरेल. नवीन ‘एमईएमएस १०८’ प्रकल्प येत्या काही महिन्यांतच राज्यभरात पाच टप्प्यांमध्ये सुरू केला जाईल.


