Wednesday, November 11, 2026
Google search engine
HomeUncategorized**भाऊबीजेला ऊसतोड कामगारांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट; कामगारांसोबत साजरी केली...

**भाऊबीजेला ऊसतोड कामगारांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट; कामगारांसोबत साजरी केली दिवाळी* 

 

 

*ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील-पंकजा मुंडे*

 

पुणे, दि. ११ : ऊन-पावसाची तमा न बाळगता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीच्या कामात राबणाऱ्या कामगारांशी आपुलकीचे नाते जपत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. तसेच पालावर चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. त्यांच्या या भेटीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगारासाठी गाव सोडून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा हा प्रसंग कामगारांसाठी आनंददायी ठरला.भाऊबीजेच्या निमित्ताने कामगारांच्यावतीने त्यांना साडीचोळीची ओवाळणी भेट दिली.

 

श्रीमती मुंडे म्हणाल्या, दरवर्षी नेहमी कष्टकारी कामगारांसोबत दिवाळी साजरी करीत असते. काही दिवसांपूर्वी २२ वर्षाचा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, हे ऐकून मन सुन्न झाले. ऊसतोड कामगारांचे पाल्यांना शिक्षण, आरोग्यासाठी मदत व्हावी तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे, आपल्या अडीअडचणीबाबत मोकळ्यापणे व्यक्त व्हा, असे सांगून श्रीमती मुंडे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

आमदार शेळके म्हणाले, सर्व सामान्य कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ताईसाहेब नेहमी उभ्या राहत असतात. ऊसतोड कामगारांच्या पालावर भेट देवून कामगारांसोबत खऱ्याअर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत आहे, असेही श्री. शेळके म्हणाले.

 

 

*पालावर स्वागताची जय्यत तयारी*

मंत्री पंकजा मुंडे पालावर येणार असल्याचे समजताच ऊसतोड कामगारांनी त्यांच्या स्वागताची उत्स्फूर्तपणे तयारी केली होती. पालासमोर सडा टाकून काढलेली रांगोळी, पारंपरिक बंजारा लोकगीते, चिमुकल्यांना नवीन कपडे घालून केलेली सजावट, भोजनाची पूर्वतयारी आणि परिसराची स्वच्छता अशा विविध बाबींचे नियोजन कामगारांनी स्वतः केले होते. त्यांच्या या उत्स्फूर्त स्वागताने पालावर सणासुदीचे वातावरण निर्माण झाले.

 

यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.

 

यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात महिलांना साडी भेट दिली.

 

*श्री.कुंडलिक बडे, रा. माणेवाडी, जि. अहिल्यानगर:* “मंत्री पंकजा मुंडे ताई आपल्या पालावर येणार असल्याचे समजल्यापासून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुकतेने तयारी केली आहे.”

 

*श्री. नवनाथ भोसले, आष्टी, जि. बीड* “पंकजा ताई पालावर येवून ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज साजरी केली, फराळ केला, महिलांना साडी चोळीचे वाटप केले आमच्यासाठी आनंददायी आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments